लॉकडाउनमुळे पोहणे मिस करतेय
आहाना कुमरा सोशल मीडियावर वारंवार स्विमिंग पुलची छायाचित्रे शेअर करत असते. आहाना स्वतःच्या मित्रमैत्रिणींसोबत छोटय़ा व्हेकेशनवर लोणावळा येथील एका गेस्ट हाउसमध्ये जात असते. पण यंदा लॉकडाउनमुळे आहानला स्वतःचा व्हेकेशन टाइम आठवू लागला आहे.
मी स्वतःला वॉटर बेबी समजते. कारण मला पाण्याबद्दल प्रचंड पेम आहे. सध्याही मी पोहण्याचा आनंद मिस करत असल्याचे आहानाने एका मुलाखतीत म्हटले आहे. लोणावळा हे आम्हा मित्रमैत्रिणींचे पसंतीचे ठिकाण राहिले आहे. आम्ही अनेकदा तीन ते चार दिवसांसाठी कामाच्या रहागाडय़ापासून दूर लोणावळा येथे जात असतो. आता देखील मला तेथील मजेचे दिवस आठवत आहेत. कामादरम्यान निवांत घालविलेल्या क्षणांची किंमत औरच होती. आता दिवसभर बसून रहावे लागत असल्याने आम्ही कंटाळलो आहोत असे तिने म्हटले आहे.
आहाना कुमराने स्वतःच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या कार्यक्रमातून केली होती. युद्ध या टीव्ही शोमध्ये तिने काम केले होते. आहाना स्वतःचे चित्रपट आणि व्यक्तिरेखांवरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचा ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ चित्रपट लक्षवेधी ठरला होता. तर ‘ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये आहानाने प्रियंका वड्रा यांच्याशी मिळतीजुळती व्यक्तिरेखा साकारली होती.
आहाना चित्रपटांसह नाटय़क्षेत्रातही अत्यंत सक्रीय असते. आहानाने वयाच्या 14 व्या वर्षी नाटय़क्षेत्रात काम सुरू केले होते. आहाना अलिकडेच खुदा हाफिज चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आगामी काळात शमशेरा, बावरी छोडी आणि लॉकडाउन इंडिया चित्रपटांमधून ती झळकणार आहे.