वृत्त संस्था/ लाहोर
इंग्लंडचा क्रिकेट संघ 2022 सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तान दौऱयावर जाणार असून या दौऱयामध्ये दोन जादा टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱयामध्ये इंग्लंड आणि पाक यांच्यात सात टी-20 सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. सदर घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे प्रमुख कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी पीसीबीचे चेअरमन रमीझ राजा यांच्याशी संपर्कानंतर केली.
इंग्लंडचा क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये परत येणार आहे. 2022 साली ऑस्ट्रेलियात होणाऱया पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर इंग्लंडचा संघ पाकविरुद्ध आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत 3 कसोटी सामने खेळणार आहे. ईसीबीचे प्रमुख कार्यकारी टॉम हॅरिसन तसेच इसीबीचे वरिष्ठ संचालक मार्टिन डार्लो यांनी अलीकडेच लाहोरमध्ये पीसीबीचे प्रमुख रमीझ राजा यांच्याबरोबर या आगामी दौऱयासंदर्भात चर्चा केली. ऑक्टोबरमधील इंग्लंडचा पाक दौरा रद्द करण्यात आला होता. भविष्यकाळामध्ये इंग्लंड आणि पाक क्रिकेट मंडळातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे हॅरिसन आणि रमीझ राजा यांनी सांगितले.
पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे पुढील सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान इंग्लंडचा संघ पाच टी-20 सामने खेळणार होता. पण, आता आणखी दोन जादा टी-20 सामने इंग्लंडचा संघ खेळणार असल्याने पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी समाधान व्यक्त केले.