मडगाव : इंज्युरी वेळेत पेनल्टीवर नोंदविलेल्या एकमेव गोलमुळे मुंबई सिटीने एफसी गोवाचा पराभव करून आयएसएल फुटबॉल लीग स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. देशभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यातील विजयाने मुंबई सिटीने दुसऱया सामन्यात आपल्या पहिल्या विजयाची नोंद
केली.
या सामन्यात 40 व्या मिनिटाला एफसी गोवाच्या रिदीम त्लांगला रेड कार्ड पडल्याने मैदान सोडावे लागले आणि यामुळे सुमारे 55 मिनिटे त्यांना दहा खेळाडूंनीशी खेळावी लागली. तरी सुद्धा एफसी गोवाने मुंबई सिटीला या सामन्यात चांगली झुंज दिली. सामन्यातील विजयी गोल ऍडम फोंड्रेने केला. एफसी गोवाचा हा पहिला पराभव असून त्यांचे दोन सामन्यांतून एक तर मुंबई सिटीचे 3 गुण झाले आहेत.
पहिल्या सत्रातील उभय संघातील झुंज एफसी गोवाने जिंकली. आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देताना एफसी गोवाने मुंबई सिटीवर वर्चस्व ठेवले. या सत्रात एफसी गोवाचे बॉल पझेशन मुंबई सिटीपेक्षा उजवे राहिले. सामन्याच्या आठव्याच मिनिटाला एफसी गोवाने आपली पहिली धोकादायक चाल रचली आणि कॉर्नरही मिळविला. यावेळी इगोर एँगुलोने हाणलेला फटका मुंबई सिटीचा बचावपटू सार्थक गोलोईने क्लियर केला.
13 व्या मिनिटाला मुंबईच्या फारुख चौधरीचा फटका एफसी गोवाच्या फिडेंडरने ब्लॉक केल्यानंतर 32 व्या मिनिटाला गोडार्डचा फ्रि कीक एफसी गोवाचा गोलरक्षक मोहम्मद नवाजने अडविला. एफसी गोवा आपले वर्चस्व दाखवत असतानाच, रिदीम त्लांगने हर्नन सांतानाला धोकादायकरित्या पाडल्याने त्याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे पहिल्या सत्रातील पाच मिनिटे तसेच उर्वरीत दुसरे सत्र दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले.
दुसऱया सत्रात दोन्ही संघाचे समान वर्चस्व लढतीवर होते. दुसऱया सत्रातील आरंभालाच इगोरने मुंबई सिटी एफसीच्या दोन बचावपटूंना गुंगारा दिल्यानंतर मूर्ताडा फॉललाही भेदले. मात्र त्याचा जमिनीलगतचा फटका गोलमध्ये जात असताना हुकला. त्यानंतर इगोरच्या स्थानावर खेळण्यास आलेल्या जॉर्ज ऑर्टिझने एफसी गोवाची गोल करण्याची संधी गमविली.
दहा खेळाडूंनीशी खेळणाऱया एफसी गोवावर शेवटच्या पाच मिनिटात मुंबई सिटीने धोकादायक चाली रचल्या. प्रथम हर्ननच्या क्रॉसवर मंदरार राव देसाईने सामन्यातील सर्वात सोपी गोल करण्याची संधी गमविली. 89व्या मिनिटाला ऍडम फोंड्राने मारलेला फटका एफसी गोवाचा गोलरक्षक नवाजने अडविला.
सामना बरोबरीत संपणार असे वाटत असतानाच बिपीन सिंगचा डी कक्षेतील हेडर लॅनी रॉड्रिग्सच्या हाताला लागल्याने मुंबई सिटीला पेनल्टी मिळाली. त्यावर ऍडम फोंड्राने अचूक गोल नोंदवला. गोलरक्षक नवाजच्या डाव्या बाजूने चेंडूला जाळीत टाकले.