क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
आरएम स्पोर्ट्स चषक हिंडलगा आयोजित रामचंद्र मन्नोळकर चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडियन बॉईज हिंडलगा संघाने मोरया स्पोर्ट्स कणबर्गी संघाचा 36 धावानी पराभव करून रामचंद्र मन्नोळकर चषक पटकाविला. शंकर होसमनीला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुड शेफर्ड मैदानावर आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना दोन डावात खेळविण्यात आला. पहिल्या डावात इंडियन बॉईज संघाने 6 षटकात 5 बाद 72 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मोरया स्पोर्ट्स कणबर्गीने 6 षटकात 4 बाद 73 धावा करून 1 धावेची आघाडी मिळविली. दुसऱया डावात इंडियन बॉईजने 6 षटकात 4 बाद 98 धावा केल्या. त्यानेतर मोरया स्पोर्ट्स कणबर्गी संघाने 6 षटकात सर्व बाद 61 धावाच केल्याने हा सामना इंडियन बॉईजने 36 धावानी जिंकला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते रामचंद्र मन्नोळकर, भाग्यश्री कोकीतकर, रामचंद्र कडोलकर, नामदेव पाटील यांच्या हस्ते विजेत्या इंडियन बॉईज संघाला 51 हजार रूपये व चषक तर उपविजेत्या मोरया स्पोर्ट्स कणबर्गी संघाला 25 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सुशांत के., उत्कृष्ट गोलंदाज शंकर होसमनी (इंडियन बॉईज), उत्कृष्ट फलंदाज संतोष सुळगे पाटील (कणबर्गी), मालिकावीर शंकर होसमनी (इंडियन बॉईज) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सामन्यासाठी पंच म्हणून विनय कोपोळकर व विराज घोरपडे तर स्कोअरर म्हणून अभिषेक कुलकर्णी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनय कुलकर्णी, विनोद, राजू काटकर, युवराज आगसगेकर, सुमित गुरव, प्रशांत काकतकर, भूषण फडके, नारायण आगसगेकर यांनी परिश्रम घेतले.