वृत्तसंस्था/ जकार्ता
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये मॅचफिक्सिंग आणि बेटिंगमध्ये इंडोनेशियाच्या तीन बॅडमिंटनपटूंचा समावेश असल्याचे तपासणीअंती आढळून आल्याने त्यांना दोषी ठरवून विश्व बॅडमिंटन फेडरेशनने त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.
2019 साली झालेल्या आशिया खंडातील कनि÷ पातळीवरील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये मॅचफिक्सिंग आणि बेटिंग करण्याच्या प्रकरणामध्ये आठ बॅडमिंटनपटूंना पकडण्यात आले होते. यापैकी पाच बॅडमिंटनपटूंना 6 ते 12 वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचा निर्णय विश्व बॅडमिंटन फेडरेशनने घेतला असून या बॅडमिंटनपटूंना प्रत्येकी 3 ते 12 हजार डॉलर्सपर्यंत दंड करण्यात आला आहे. मात्र, इंडोनेशियाच्या तीन बॅडमिंटनपटूंवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. मॅचफिक्सिंग प्रकरणामध्ये एका मलेशियन नागरिकाचा समावेश असल्याचेही तपासणी पथकाला आढळून आले. सदर मलेशियन व्यक्ती बॅडमिंटन क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंना ब्रॅण्डेड साहित्य पुरवत असे. त्याचप्रमाणे विविध आंतरराष्ट्रीय सामन्यातील निकाल निश्चित करण्यासाठी ही मलेशियन व्यक्ती बऱयाच बॅडमिंटनपटूंना मोठय़ा रकमेची ऑफर देत असे. दोषी ठरलेल्या बॅडमिंटनपटूंना विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाद मागण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.