देशात आतापर्यंत 800 मुलांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ जकार्ता
केरोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंट इंडोनेशियात मुलांसाठी घातक ठरला आहे. मागील काही आठवडय़ांमध्ये कोरोना महामारीमुळे शेकडो मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी होते. इंडोनेशियातील मुलांचा मृत्यू दर जगातील अन्य भागांच्या तुलनेत खूपच अधिक आहे.
इंडोनेशियातील या भयावह स्थितीने जगाला चिंतेत टाकले आहे. चालू महिन्यात केवळ एका आठवडय़ात 100 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशिया सद्यकाळात कोरोना सर्वाधिक ग्रस्त देश ठरला आहे. दक्षिणपूर्व आशियात डेल्टा व्हेरियंट धुमाकुळ घालत असताना मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. इंडोनेशियात आता प्रतिदिन 50 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित सापडत आहेत.
इंडोनेशियातील एकूण कोरोनाबाधितांमध्ये मुलांचे प्रमाण 1.5 टक्के इतके आहे. 12 जुलै रोजी संपलेल्या आठवडय़ातच 150 मुलांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियात आतापर्यंत कोरोनाचे 30 लाख रुग्ण सापडले असून 83 हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 800 मुले दगावली आहेत. पण यातील बहुतांश मुलांचा मृत्यू चालू महिन्यात झाला आहे.