ऑनलाईन टीम / इंदौर :
इंदौरमध्ये ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एअर होस्टेस मानसी सिंगने चार वर्षांत अडीच कोटी रुपयांचे ड्रग्ज विकल्याचा खुलासा केला आहे. तसेच या रॅकेटमधील काही नावे समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वर्षाच्या मुलीच्या डायपरमधून ड्रग्ज पुरवताना एअर होस्टेस मानसी सिंगला इंदौरमधून शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. तिला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून, एक वर्षाच्या मुलीला मानसीच्या बहिणीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिसांनी पकडलेल्या सागर जैन यांच्या रॅकेटचाही मानसी हा एक भाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर जैनला पोलिसांनी 13 महिन्यांपूर्वी अटक केली होती. तरीही अंमली पदार्थांची तस्करी आणि पुरवठा थांबलेला नाही. ड्रग्ज रॅकेटशी संबंधित नवीन नावे समोर आली आहेत.
बांग्लादेशी सेक्स रॅकेट उघडकीस
इंदौरमधील ड्रग्ज रॅकेट बांग्लादेशी सेक्स रॅकेटमधून उघडकीस आले आहे. विजय नगर पोलिसांनी बानगंगा भागातून डांबून ठेवलेल्या दोन मुलींची सुटका केली होती. याच प्रकरणात सागर जैन यांच्यासह ड्रग रॅकेटमधील दिनेश अग्रवाल, वेदप्रकाश व्यास, चिमन अग्रवाल, अक्षय अग्रवाल, विकी परियानी, मानसी सिंग या पात्रांची नावे समोर आली आहेत.