ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशभर आंदोलन केले. राजधानी दिल्लीपासून, मुंबई, पुणे, बंगळूरु, सातारा, अमरावतीमध्ये आंदोलने करण्यात आली.
दिल्लीत आयपी कॉलेज समोर आंदोलन करत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करताना पोलिसांनी रोखले. तर बंगळुरूमध्ये सायकल रॅली काढण्यात आली. काँग्रेस नेता व माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी आपल्या घरापासून सायकल चालवत विरोध दर्शवला.
पुण्यात बाळासाहेब थोरात, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलने केली. पुण्यात बाळासाहेब थोरात यांनी ‘वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा पेट्रोल’ असा फलक हातात घेऊन त्यांनी नारेबाजी केली. साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमालीचे घसरले असताना त्याचा फायदा इंधनाचे दर कमी करुन जनतेला पोहचवण्याऐवजी उत्पादन शुल्कात सातत्याने वाढ करुन खिसे भरण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला.