वृत्तसंस्था/ गोवानिया, ब्राझील
स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी झुंज देणाऱया इक्वेडोर संघाने येथे झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेतील सामन्यात यजमान ब्राझीलला 1-1 असे बरोबरीत रोखत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. पेरू संघानेही व्हेनेझुएलाचा 1-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
व्हेनेझुएला संघाला स्पध्sा&च्या सुरुवातीलाच कोरोनाबाधित खेळाडूंचा फटका बसला होता. पेरूकडून झालेल्या पराभवाने त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. दहा सामन्यांची विजयी मालिका पुढे चालू ठेवण्यासाठी ब्राझील संघ ब गटातील या शेवटच्या सामन्यात उतरला होता. संघाचे प्रशिक्षक टिटे यांनी नेमारला या सामन्यात विश्रांती दिली होती. तरीही त्यांनी इक्वेडोरविरुद्ध पूर्वार्धात वर्चस्व राखले होते. 37 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर इदेर मिलितावने हेडरवर गोलजाळय़ाच्या वरच्या उजव्या कोपऱयात चेंडू धाडत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. इक्वेडोरचा गोलरक्षक हर्नान गॅलिन्डेझने झेपावत हा चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याच्या आवाक्यात आला नाही.
सामना गमविल्यास स्पर्धेतून आपली एक्झिट होणार, याची जाणीव असल्याने इक्वेडोरने पिछाडीवर पडल्यानंतर उत्तरार्धात झुंजार खेळ केला आणि 53 व्या मिनिटाला त्यांना यशही मिळाले. ब्राझीलच्या खेळाडूंनी कॉर्नर किक क्लीअर करण्याचा प्रयत्न केला. पण एनर व्हॅलेन्सियाने हेडरवर तो परत माघारी धाडला. यावेळी अँजेल मेनाने त्यावर ताबा घेत आगेकूच केली आणि जोरदार फटक्यावर ब्राझीलचा गोलरक्षक ऍलिसनला हुलकावणी देत गोल नोंदवला. ‘उत्तरार्धापेक्षा पूर्वार्धात आमचा खेळ चांगला झाला. आता आम्ही बाद फेरीत पोहोचलो असल्याने आम्हाला सर्वोत्तम फुटबॉलच खेळावे लागणार आहे,’ असे ब्राझीलचा डिफेंडर माक्विन्होज म्हणाला.
पेरूने गटसाखळीतील शेवट विजयाने करीत आगेकूच केली. त्यांनी पहिल्या पराभवानंतर चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्या सामन्यात ब्राझीलकडून त्यांना 0-4 असा धक्का सहन करावा लागला. पण त्यानंतर त्यांनी कोलंबियावर विजय मिळविला आणि इक्वेडोरविरुद्ध 0-2 अशा पिछाडीनंतरही सामना बरोबरीत सोडवला होता. व्हेनेझुएलावर विजय मिळवित त्यांनी आणखी 3 गुण मिळविले असून 48 व्या मिनिटाला आंद्रे कॅरिलोने नोंदवलेला एकमेव गोलच शेवटी निर्णायक ठरला. ब गटात ब्राझीलने चार सामन्यांत 10 गुण घेत पहिले, पेरूने 7 गुणांसह दुसरे, कोलंबियाने 4 गुणांसह तिसरे, इक्वेडोरने 3 गुणांसह चौथे स्थान मिळविले. व्हेनेझुएला व गट अ मधील बोलिव्हिया या दोन संघांचे आव्हान साखळी फेरीतच समाप्त झाले. या स्पर्धेतील शेवटचे आठ संघ निश्चित झाले असून उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विजेत्या ब्राझीलची लढत चिली किंवा उरुग्वे यापैकी एकाशी होणार आहे.