आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केल्याची चर्चा
प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील वर्धमान हौसिंग सोसायटी मधील बेपत्ता यंत्रमाग उद्योजकांचा मृतदेह मंगळवार दुपारी आढळून आला. अमर डोंगरे असे त्याचे नाव आहे. तो सोमवार (२१ डिसेंबर) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले होते. मृत डोंगरे यांनी आर्थिक विवंचनेतून केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मृत उद्योजक डोंगरे हे शहरातील एका सहकारी बँकेचे माजी संचालक व एका सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी होते. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यांच्या निराशेतून ते सोमवारी (२१ डिसेंबर) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणासही न सांगता दुचाकी घेवून निघून गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने नातेवाईकानी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाईल घरीच मिळून आला. त्यानंतर नातेवाईकानी शहरात सर्वत्र शोध सुरू केला. यादरम्यान त्यांच्या नातेवाईकांना त्यांची दुचाकी येथील पंचगंगा नदी घाटावरील वरद विनायक मंदिरा नजीक आढळून आली होती. त्यामुळे मृत डोंगरेनी पंचगंगा नदीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, या शक्येतेने नातेवाईक व मित्र मंडळीनी पंचगंगेत शोध सुरु केला होता. पण अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. पुन्हा मंगळवारी सकाळी नदीत शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्यावेळी नातेवाईकांना त्याचा मृतदेह कट्टी मोळालगत पंचगंगा नदीत तरंगत असलेला आढळून आला. याची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. डोंगरे या यंत्रमाग उद्योजकाने पंचगंगा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याने यंत्रमाग उद्योगात खळबळ उडाली आहे.