प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली कोरोना पॉझिटिव्ह वृद्धेचा दुसरा स्वॅबही निगेटिव्ह आला. त्यामुळे तिला शुक्रवारी डिसचार्ज दिला जाणार आहे. बुधवारी पाठवलेल्या 68 स्वॅबपैकी 23 जणांचे रिपोर्ट मिरज येथून निगेटिव्ह आले आहेत. सीपीआर हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये बुधवारी इचलकरंजी येथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा कार्डियोजेनिक शॉकने मृत्यू झाला आहे. याशिवाय 9 दिवसांच्या अर्भकाचा हर्नियाने मृत्यू झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे इचलकरंजी येथील 60 वर्षीय पुरूष दाखल झाला. गुरूवारी सकाळी त्याचा कार्डियोजेनिक शॉकने मृत्यू झाला. तसेच एनआयसीयू वॉर्डमध्ये नवजात अर्भकाचा हर्नियाने मृत्यू झाला. बुधवारी कोरोना वॉर्डमध्ये दोघा संशयितांचा मृत्यू झाला होता. त्यातील एक इचलकरंजीचा होता. गुरूवारीही इचलकरंजीतील वृद्धाचा या वॉर्डमध्ये मृत्यू झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, कसबा बावडा मराठा कॉलनी येथील वृद्धा सातारा जिल्हय़ात गेली होती. ती कोल्हापुरात परत आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली. तिचा स्वॅबही पॉझिटिव्ह आला. तिला गेल्या आठ वर्षांपासून क्षयाचाही त्रास होता. तिच्यावर सीपीआरमधील आयसोलेटेड वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिचे कोरोंटाईन काळातील दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तिला शुक्रवारी सकाळी घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.