इचलकरंजी / प्रतिनिधी
नगरपालीकेच्या मैल खड्डयानजीक गांजा विक्री करणाऱ्यास आलेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा 1 किलो 850 ग्रॅमचा गांजा आणि दुचाकी, एक मोबाईल हॅण्डसेट असा 57 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद तोहिदआलम सिद्दिकी (वय 23, रा. नांदणी रोड, बालाजी पार्क, संभाजीपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने मिरज (जि.सांगली) मोहन नामक [पुर्ण नाव व पत्ता माहित नाही] व्यक्तीकडून गांजा आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, शहरातील सांगली नाक्याहून टाकवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मैलखड्डा परीसरात एक व्यक्ती गांजा विक्री करण्यास येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यावरुन गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कॉन्स्टेबल बबन माळी, सचिन मगदूम, नितीन जाधव आदीनी या परिसरात सापळा लावला. यावेळी पोलिसांनी मोहम्मद सिद्दिकी ( वय 23, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीची तपासणी केली असता दुचाकीच्या डिगीमध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. त्यावरुन त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांने मिरज येथील मोहन नामक [पुर्ण नाव व पत्ता माहित नाही] व्यक्तीकडून गांजा विक्रीसाठी घेऊन आल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक केली. पोलिसांनी मिरज मधील त्या व्यक्तीबरोबर गांजा विकत घेणाऱ्या इचलकरंजीतील व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.