इचलकरंजी / प्रतिनिधी
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यानजीक मोपेडवरुन बेकायदेशिरपणे विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी पकडून अटक केली. किरण दिनकर चाबूक ( वय २६ , रा . भोनेमाळ , इचलकरंजी ) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून ११ हजार ७१२ रुपयांची विदेशी दारु आणि मोपेड असा ६१ हजार ७१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने केली .
शहरात होत असलेल्या मोबाईल स्नॅचिंग गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या कार्यालयातील पोलीस नाईक सुनिल पाटील , सागर हारगुले , प्रविण परीट , कॉन्स्टेबल संतोष साळुखे आदी शहरात गस्त घालीत होते . यावेळी या पोलीस पथकाला डेक्कन चौक ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इचलकरंजी प्रवेशव्दाराच्या कमानीजवळ संशयीत आरोपी किरण चाबुक हा मोपेडवरुन संशयीत फिरताना मिळून आला.
त्याला ताब्यात घेवून मोपेडची झडती घेतली असता पोलिसांना ११ हजार ७१२ रुपये किंमतीची डॉक्टर बॅन्डीच्या ४८ बाटल्या आणि इंम्पेरियल ब्ल्यु व्हिस्कीच्या ४८ बाटल्या अशा ९६ विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या . यांची शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे .