इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील डेक्कन चौकानजीक गॅस सिलेंडरची वाहतुक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील विवाहित महिला गंभीर जखमी झाली. महानंदा मारुती कोकाटे (रा. सरनोबतवाडीत, ता. करवीर) असे त्या महिलेचे नाव आहे. जखमीस त्वरीत आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तिची प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात बुधवारी दुपारी घडला असून, यांची नोंद पोलिसात झाली आहे.
सरनोबतवाडीत मारुती कोकाटे हे रेल्वेमध्ये नोकरी करीत आहेत. ते बुधवारी दुपारी इचलकरंजीतील नातेवाईकाच्याकडे पत्नी महानंदा आणि मुलगी असे तिघे जण दुचाकीवरून आले होते. त्यांंना भेटून ते स्टेशन रोडवरून गावाकडे जात होते. यावेळी शहरातील डेक्कन चौकालगत त्यांच्या दुचाकीला गॅस सिलेंडर भरून जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेनंतर कोकाटे आणि त्याची मुलगी रस्त्याच्या बाजूला तर पत्नी महानंदा रस्त्यावर पडल्याने त्याच्या उजव्या पायावरून ट्रक चे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.