अंगावर कोड उठल्यानंतर अनेकांचं मानसिक खच्चीकरण होतं. चेहर्यावर, अंगावर दिसणारे पांढरे डाग, चट्टे म्हणजे सौंदर्याचा नाश. कोणालाही, कोणत्याही वयात कोड उठू शकतं. त्यातही कोड उठल्यानंतर पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. लोकांच्या विचित्र नजरांना सामोरं जावं लागतं. आता सगळं संपलं अशीच अनेकांची भावना होऊ लागते. बंगळूरूच्या प्रार्थना जगनच्या बाबतीतही असंच घडलं. प्रार्थना अकरा वर्षांची असताना तिच्या चेहर्यावर कोडाचा पहिला चट्टा पडला. त्यानंतर सुरू झाला तो संघर्ष. प्रार्थनाने वेगवेगळे उपचार घ्यायला सुरुवात केली. मात्र 2016 मध्ये तिने स्वतःला आहोत तसं स्वीकारायचं ठरवलं आणि कोडावरच्या महागडय़ा, वेदनादायी उपचारांना, शत्रक्रियांना अलविदा केलं. प्रार्थना यशस्वी मॉडेल बनली. आज तिच्याकडे इंजिनिअरींगची पदवी आहे. तसंच ती डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातली तज्ञही आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा मार्ग अजिबात सोपा नव्हता.
प्रार्थना ऐश्वर्या राय आणि करीना कपूरचे गोड, गोजिरे चेहरे बघत मोठी झाली. त्यामुळे तिनेही सौंदर्याची ठरावीक व्याख्या केली होती. अकरा वर्षांची असताना तिच्या कपाळावर कोडाचा छोटा चट्टा पडला. हा चट्टा बघून लहानगी प्रार्थना हादरली. हा चट्टा कमी व्हायच्याऐवजी वाढतच गेला. चेहर्याच्या उर्वरित भागालाही कोडाने ग्रासलं. यावरील उपचारांसाठी सल्ला विचारायला गेलेल्या डॉक्टरने प्रार्थनाला उन्हात उभं राहायला सांगितलं. यामुळे कोड शरीरावर पसरू लागलं. चेहर्यावरचे डाग लपवण्यासाठी तिने सौंदर्यप्रसाधनांचा आधार घेतला. जवळपास अर्धा तास ती मेकअप करत असे. अगदी किराणा आणायला जातानाही प्रार्थना मेकअप करायची. याच कोडामुळे शाळेतल्या मैत्रिणीही तिला चिडवायच्या. तिच्या पापण्या आणि भुवया पांढर्या झाल्याने अनेकांनी तिला म्हातारी म्हणूनही हिणवलं. या सगळ्यामुळे तिला खूप एकटं वाटू लागलं. मात्र प्रार्थनाला आईवडिलांची समर्थ साथ लाभली. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या चेहर्यावर बर्याच शत्रक्रिया करण्यात आल्या.
2016 मध्ये तिने स्वतःला स्वीकारलं आणि कोडाच्या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी यू टय़ूब चॅनल सुरू केलं. मग तिने इन्स्टाग्रामचा आधार घेतला. प्रार्थनाच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. प्रार्थना समाजमाध्यमांवर सक्रिय झाली. सोशल मीडियामुळे ती एका मॉडलिंग स्पर्धेत सहभागी झाली. तिने काही मासिकांसाठी मॉडलिंग केलं. 2020 मध्ये कॉसमॉस मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचं छायाचित्र झळकलं. तिने मॉडलिंगचे करारही केले. आज प्रार्थना खूप यशस्वी आहे. कोडाबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम तिने सुरू ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत खचून जायचं नसतं हेच तिने दाखवून दिलं आहे.