वास्को
इटलीहून गोमंतकीय खलाशांना घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले तिसरे विमान बुधवारी रात्री उशिरा दाबोळी विमानतळावर दाखल झाले. या विमानातून एकूण 81 खलाशी उतरले. रात्रीच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना कदंबच्या बसमधून कॉरन्टाईनसाठी रवाना करण्यात आले. त्यामुळे बुधवारी एकूण तीन विमानातून 416 गोमंतकीय खलाशी गोव्यात दाखल झाले.
बुधवारी सकाळी 168 व संध्याकाळी 167 गोमंतकीय खलाशी इटलीहून खास विमानाने गोव्यात दाखल झाले होते. इटलीहून गोव्याकडे येणाऱया तिसऱया विमानाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, हे विमान रात्री उशिरा दाबोळीत दाखल झाले. या विमानातून 81 गोमंतकीय खलाशी उतरले. आरोग्य तपासणीनंतर त्यांची कॉरन्टाईनसाठी रवानगी करण्यात आलेली आहे. तिन्ही विमानातून गोव्यात दाखल झालेल्या खलाशांची संख्या 416 झाली आहे.
इटलीचे 38 पर्यटक मायदेशी रवाना
बुधवारी रात्री 81 गोमंतकीय खलाशांना घेऊन गोव्यात दाखल झालेल्या विमानाने परतीच्या प्रवासात इटलीच्या 38 पर्यटकांना घेऊन इटलीला प्रयाण केले. हे पर्यटक लॉकडाऊनमुळे गोव्यातच अडकले होते. गुरूवारी सकाळी इटलीच्या 38 पर्यटकांनी गोव्याचा निरोप घेतला. आतापर्यंत 38 खास विमानसेवाव्दारे गोव्यातून जवळपास साडे सात हजार विदेशी पर्यटक मायदेशी रवाना झाले आहेत.
ब्राझीलहून गोमंतकीय खलाशी दाखल होणार
ब्राझीलमध्ये अडकलेले बरेच गोमंतकीय खलाशी गोव्यात येण्याच्या वाटेवर आहेत. संबंधीत शिपिंग कंपनीने त्यांच्यासाठी विशेष हवाई सेवा उपलब्ध केलेली असून जहाजामधूनही हजारो खलाशी गोव्यात दाखल होतील अशी माहिती गोवा खलाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली आहे.
त्यांनी दाबोळी येथे पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार विदेशात जवळपास पाच हजार गोमंतकीय खलाशी अडकलेले असून ते हवाई आणि जलमार्गे दाखल होणार आहेत. काही खलाशांना घेऊन युरोप आणि अमेरीकेमधून जहाज गोव्याकडे येण्यासाठी बाहेर पडलेले आहे. ब्राझीलहून गोमंतकीय खलाशांना घेऊन दोन विमाने भारतात येणार असून त्यापैकी एक गोव्यात तर दुसरे मुंबईत उतरेल अशी माहिती त्यांनी दिली. येत्या दि. 28 व 29 या दिवसांत ही विमाने भारतात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.