ब्रिटनमधील वॉल्टर समरफोर्डचे अनोखे दुर्दैव
‘इतिहासातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती’ची कहाणी जाणून घेणे रंजक ठरणार आहे. या व्यक्तीमागे एक अत्यंत रहस्यमय कथा असून ती जाणून घेतल्यावर हैराण व्हायला होते. वॉल्टर समरफोर्ड हे ब्रिटनमध्ये राहणारे होते. तसेच ते सैन्यात अधिकारी होते. त्यांच्यासोबत एकसारख्या तीन रहस्यमय घटना घडल्या होत्या. याचमुळे त्यांना ‘दुर्दैवी’ मानले जाऊ लागले. एवढेच नाही तर मृत्यूनंतरही त्यांच्यासोबत तशीच घटना घडली होती.
वॉल्टर समरफोर्डसोबत पहिली घटना 1918 मध्ये घडली होती. तेव्हा ते महायुद्धावेळी बेल्जियममध्ये तैनात होते. एक दिवस घोडेस्वारी करत असताना त्यांच्यावर आकाशातून वीज कोसळली. यामुळे त्यांचा कंबरेखालील भाग लुळा पडला. पण काही महिन्यांमध्येच ते बरे झाले आणि हिंडू लागले. पण त्यापूर्वीच सैन्याकडून त्यांना सक्तीने सेवामुक्त करण्यात आले होते.
वॉल्टर समरफोर्ड यांच्यासोबत दुसरी घटना 1924 मध्ये घडली. त्यावेळी त्यांनी कॅनडात त्यांनी स्वतःच्या नव्या जीवनाची सुरुवात केली होती. एक दिवस मासेमारीसाठी नजीकच्या तलावात गेले असताना ते एका झाडाखाली बसले होते. तेव्हा अचानक पुन्हा त्यांच्यावर आकाशातून वीज कोसळली. यावेळी त्यांच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला. पण चमत्कारिकपणे दोन वर्षांमध्ये ते पूर्ण बरे झाले आणि हिंडू लागले.
1930 मध्ये वॉल्टर यांच्यासोबत पुन्हा तशीच घटना घडली. ते एका उद्यानात फिरत असताना अचानक हवामान बिघडले आणि आकाशात ढग दाटून आले. याचदरम्यान त्यांच्या शरीरावर वीज कोसळली. तिसऱयांदा वीज कोसळल्यावरही त्यांनी दोन वर्षांपर्यंत स्वतःच्या जीवनासाठी संघर्ष केला. पण अखेरीस ते मृत्यूसोबतची झुंज हरले आणि 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
वॉल्टर यांना कॅनडाच्या व्हँकुव्हरमधील माउंटेन ह्यू दफनभूमीत दफन करण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे मृत्यूनंतरही आकाशातील वीजेने त्यांचा पाठलाग सोडला नाही. 1936 मध्ये त्यांच्या कब्ा्रवर पुन्हा एकदा वीज कोसळली आणि तेथे लावण्यात आलेला दगड तुटला.
दर 6 वर्षांनी वॉल्टर यांच्यावर वीज का कोसळायची हे आज देखील रहस्य आहे. पण ज्याप्रकारे त्यांच्यासोबत एकाचप्रकाच्या घटना वारंवार घडल्या, ते पाहता त्यांना ‘इतिहासातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती’ म्हटले जाऊ लागले.