नौदलाचे निवृत्त चिफ ऑफिसर अनंत जोशी यांचे मत : मिरामार येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन
प्रतिनिधी / पणजी
इतिहासाच्या अभ्यासासाठी शस्त्रास्रे महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे इतिहास समजून घेण्यासाठी शस्त्रांचा उपयोग होतो, म्हणून मिरामार येथे भरविण्यात आलेल्या शस्त्रास्र प्रदर्शनाला भेट द्यावी, असे मत नौदलाचे निवृत्त चिफ ऑफिसर अनंत जोशी यांनी व्यक्त केले आहे.
शिवजयंती उत्सव सोहळा 2021 निमित्त महाराष्ट्र मंडळ गोवा आणि शिवगर्जना प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मिरामार येथील युथ हॉस्टेल शस्त्रास्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री. जोशी बोलत होते. यावेळी इतिहास तज्ञ सचिन मदगे, नानासाहेब झाकणे, श्रद्धा खलप, राजाराम पाटील, विजय कुडाळकर, विशाल गायकवाड, संजय चव्हाण, विकास पालांडे यांची उपस्थिती होती.
यावेळी संदीपसिंह सावंत यांनी शस्त्रास्रांची माहिती दिली. अजय चौगुले यांनी शस्त्रांचा वापर कसा होत होता याची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी बोलताना आताची पिढी खेळ आणि कला यापासून दूर होत आहे. त्यांना पुन्हा त्या कलांकडे जोडण्यासाठी प्राचीन युद्धकलांचा अभ्यास गरजेचा आहे. तसे झाल्यास मुलांचा सर्वांगिण विकासासाठी अशा प्रकारची प्रदर्शने महत्वाची भूमिका बजावतील, असे मत श्री. सावंत यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनात विविध प्रकारच्या तलवारी, दांडपट्टे, ढाली, कटय़ारी, वाघनखे, जांबिया, भाले, कुऱहाडी, दस्तान, तोफगोळे, आदी शस्रे ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शन आजही खुले राहणार आहे.
सेवा सन्मान पुरस्कारांचे आज वितरण
दरम्यान, आज सायंकाळी 4.30 वाजता मिरमार सर्कल ते युथ हॉस्टेल दरम्यान जगदंब ढोल पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायं. 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा सांगणारे इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे शिवव्याख्यान होणार आहे. 6.45 वा. श्रीमंत हिरोजी इंदुलकर सेवा सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रात्री 7.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने दोन दिवसांच्या महोत्सवाची सांगता होणार आहे.