वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलिया यावर्षी तीन विश्वचषक स्पर्धा भरविण्याची संधी मिळाली असून विश्व इनडोअर क्रिकेट फेडरेशनने 11 व्या टी-20 इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मेलबर्नला दिल्याचे जाहीर केले. 10 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
मेलबर्नमधील दोन अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमवर यातील सामने होणार आहेत. कॅसे स्टेडियम व सिटी पॉवर सेंटर येथे हे सामने खेळविण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा पुरुष व महिला संघ दोघांनीही मागील इनडोअर विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. ‘आपल्याच देशात विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी फार कमी क्रिकेटपटूंना मिळतो. पण ऑस्ट्रेलियन संघांना यावर्षी अशी संधी मिळाली आहे, याचा त्यांना आनंद वाटेल. क्रिकेटच्या या फॉरमॅटमधील रोमांच व कौशल्य दाखविण्यासाठी क्रिकेटपटूंना हे व्यासपीठ मिळाले आहे,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एक पदाधिकारी बेलिंडा क्लार्क म्हणाल्या.
मागील स्पर्धा 2017 मध्ये दुबईत घेण्यात आली होती. जगभरातील दहा देशातील क्रिकेटपटू यात सहभागी होणार असून त्यांचे चार विभाग करण्यात आले आहेत. 21 आणि 21 वर्षांखालील पुरुष तसेच 21 व 21 वर्षांखालील महिला, पुरुषांसाठी खुली आणि महिलांसाठी खुली असे हे विभाग करण्यात आले आहेत. या वर्षी ऑस्ट्रेलियात महिला व पुरुषांची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून इनडोअर विश्वचषक ही त्यांच्यासाठी तिसरी स्पर्धा असेल.