ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्व पत्नी रेहम खान यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. आपल्या पुतण्याच्या लग्नातून घरी परतत असताना हा हल्ला झाल्याचे रेहम यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच हाच का इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
रेहम खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी माझ्या पुतण्याच्या लग्नातून परतत असताना काही लोकांनी माझ्या कारवर गोळीबार केला आणि दोन मोटारसायकल स्वारांनी बंदुकीच्या जोरावर माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी तात्काळ गाडी बदलली. कारमध्ये माझा सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर होता. हा इम्रान खान यांचा नवीन पाकिस्तान आहे का? भ्याड, लुटारू आणि लोभी लोकांच्या देशात आपले स्वागत आहे.’
सामान्य पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे मला पाकिस्तानात जगायचं आणि मरायचंय आहे. मग माझ्यावर भ्याड हल्ला होवो किंवा रस्त्यात चिंध्या उडवल्या जावोत. याची जबाबदारी या सरकारने घ्यावी. मी माझ्या देशासाठी गोळय़ा झेलण्यासही तयार आहे’ असेही रेहम खान यांनी म्हटले आहे.