मुंबई / वृत्तसंस्था
अष्टपैलू इरफान पठाणने शनिवारी सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. सातत्याने दुखापतीचा फटका बसत असल्याने इरफान आपल्या गुणवत्तेला पूर्ण न्याय देऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवरच, त्याच्या 15 वर्षातील कारकिर्दीची सांगता झाली. 35 वर्षीय इरफानने फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत जम्मू व काश्मीर संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो व्यावसायिक क्रिकेटमधून बाहेर असल्याने ही निवृत्ती साहजिकच ठरली.
2018 मध्ये जम्मू व काश्मीरकडून खेळाडू व मार्गदर्शक म्हणून योगदान देण्यापूर्वी इरफानने सर्व प्रथमश्रेणी क्रिकेट केवळ बडोदा संघाकडूनच खेळले होते. सध्या तो जम्मू व काश्मीर संघातर्फे प्रत्यक्ष न खेळता मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता. मागील महिन्यात संपन्न झालेल्या आयपीएल लिलावासाठीही त्याने उपलब्धता कळवण्यात स्वारस्य घेतले नाही. 2003 मध्ये ऍडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले, त्यावेळी त्याची गोलंदाजी म्हणजे जणू वाऱयाची झुळूक असायची. अवघ्या 19 व्या वर्षीच त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती.
इरफानने फक्त वेगावर कधीच लक्ष केंद्रित केले नाही. पण, उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया फलंदाजासाठी आत येणारे त्याचे इनस्विंगर चेंडू नेहमीच भेदक ठरत राहिले. महान अष्टपैलू कपिलदेव यांच्याशी इरफानची सातत्याने तुलना झाली. पठाणने ऑक्टोबर 2012 मध्ये भारतातर्फे शेवटचा सामना खेळला.
2003-04 मधील कसोटी दौऱयात त्याचा भेदक स्पेल विशेष गाजला, त्यात त्याने स्टीव्ह वॉ व ऍडम गिलख्रिस्ट यांना बाद केले. अर्थात, तो सामना मात्र अनिर्णीत राहिला होता. याशिवाय, 2007 टी-20 विश्वचषक जेत्या भारतीय संघाचा तो सदस्य राहिला. पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीत तो सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.
बॉक्स
इरफान पठाणचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदान
29 कसोटी सामन्यात 1105 धावा व 100 बळी
120 वनडेत 1544 धावा व 173 बळी
24 टी-20 सामन्यात 172 धावा व 28 बळी