प्रतिनिधी/सांगली
इस्लामपूर पोलीस ठण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार कपील कृष्णा पवार व त्याच्या टोळीस सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्हयातून वर्षासाठी तडीपार करण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी देण्यात आले. कपील कृष्णा पवार वय 24 रा उरूण इस्लामपूर, सुरज ऊर्फ पांडया अशोक जाधव वय 21 रा उरूण इस्लामपूर व रोहित अरूण भोसले वय 27 रा इटकरे अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रस्तावित हद्दपार कपील पवार हा टोळीप्रमुख असून तो इस्लामपूर शहरात टोळीच्या माध्यमातून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणी, अपहरण करणे, गर्दी मारामारी, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान, जुगार असे अनेक गुन्हे करीत होता, या टोळीविरूध्द 2014 ते 19 दरम्यान सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिला होता.
या प्रस्तावचे अवलोकन करून कपील कृष्णा पवार वय 24 रा उरूण इस्लामपूर, सुरज ऊर्फ पांडया अशोक जाधव वय 21 रा उरूण इस्लामपूर व रोहित अरूण भोसले वय 27 रा इटकरे या तिघांना सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्हयातून वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिला आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरिक्षक श्रीकांत पिंगळे, सहा निरिक्षक सुनिल हरूगडे, सिध्दाप्पा रूपनर, शशिकांत जाधव, दिपक गडडे, आदींनी भाग घेतला.