क. बांधकाम अभियंत्याची तक्रार : ठार मारणे, नोकरी घालवण्याची धमकी
इस्लामपूर / प्रतिनिधी
खाजगी सावकारांनी गट तयार करुन जिल्हा परिषद, सांगली विभागातील कनिष्ठ अभियंता बाजीराव दिनकर पाटील, इस्लामपूर यांना मुद्दल व व्याजासाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या अकरा सावकारांविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपींमध्ये व्यावसायिक, व्यापारी यांचा सहभाग असून यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बालम जमादार (वाघवाडी) जगन्नाथ चिखले (नवेखेड) सुजित पाटील, संभाजी पवार (इस्लामपूर) धैर्यशील पाटील, ज्ञानदेव जाधव (सातवे) यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा नोंद झाला आहे.
जमादार याच्यासह नऊ जणांनी खाजगी सावकारांचे गट तयार केले असल्याचे पाटील यांनी फिर्यादित म्हटले आहे. या गटाकडून पाटील यांनी वेगवेगळ्या टक्केवारीने २२लाख ९० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी व्याजाची रक्कम दिली आहे. तसेच सुजित पाटील, धैर्यशील पाटील हे पाटील यांना मुद्दल व्याजाचे ७० ते ८० लाख रुपये व जमादार याचे १५ लाख रुपये असे ८५ ते ९० लाख मागत आहेत. या सावकारांनी घरी येवून आणि वारंवार फोन वरुन तगादा लावला आहे. संभाजी पवार याचे ९० हजार ,पोटव्याजाचे ७२ हजार रुपये देवूनही आणखी रुपयांची मागणी करत आहे. या प्रकरणाचा आधिक चपास इस्लामपूर पोलिस करत आहेत