वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील हिंदू जनतेसाठी लवकरच भगवान श्रीकृष्णाचे मंदीर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच हिंदू पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी एक स्मशानभूमीही निर्माण केली जाणार आहे. सध्या येथील हिंदूंना त्यांची धार्मिक कृत्ये करण्यासाठी शहराबाहेर जावे लागत आहे.
इस्लामाबादच्या एच 9 विभागात 20 हजार चौरस फूट भूमीवर हे मंदीर बांधण्यात येणार आहे. येथील हिंदू पंचायतीने हे कृष्णाचे मंदीर असेल असे सांगितले आहे. या बांधकामासाठी 10 कोटी रूपये खर्च येणार असून तो सरकारकडून केला जाईल, अशी माहिती पाकचे धार्मिक व्यवहार मंत्री नुरूल हक काद्री यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मंदीर बांधकामाचा शुभारंभ गेल्या मंगळवारी पाक मानवाधिकार विभागाचे संसदीय सचिव लालचंद मल्ही यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. इस्लामाबादच्या परिसरात 1947 पूर्वी अनेक हिंदू मंदिरे होती. मात्र ती नंतर ओस पडली, अशी माहिती मल्ही यांनी पत्रकारांना दिली.
पाकिस्तानात बांधले जाणारे हे 1947 नंतरचे पहिलेच हिंदू मंदीर असण्याची शक्यता आहे. बांधकाम पूर्ण होण्यास 3 ते 4 वर्षे लागू शकतात असे सांगण्यात आले.