शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांची मागणी
प्रतिनिधी / मडगाव
शासनाने अतिरिक्त परिचारिकांच्या नेमणुका करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष व शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी गेल्या जानेवारीत ईएसआय योजनेंतर्गत सुरू केलेल्या भरती प्रक्रियेच्या स्थितीबाबत सरकारने चित्र स्पष्टता करावे, अशी मागणी केली आहे.
कुतिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी, 2019 मध्ये सरकारने विविध प्रकारची पदे भरण्यासाठी सूचना प्रकाशित केली होती. 8 जानेवारी, 2019 रोजी जारी केलेल्या सूचनमेध्ये 63 परिचारिका, 15 फार्मासिस्ट, 6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 2 रेडिओलॉजिस्ट आणि 1 स्टेनोग्राफर अशी पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या पदांसाठी लेखी परीक्षा देखील 25 ऑगस्ट, 2019 रोजी घेण्यात आली होती. आता यास दहा महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून अद्याप या पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
वैद्यकीय कर्मचाऱयांच्या कमतरतेमुळे आणि ते तणावग्रस्त परिस्थितीत काम करत असल्यामुळे प्रंटलाइन वॉरियर्सवर ताण पडत आहे हे अगदी खरे आहे. त्यामुळे ही 87 पदे भरण्यासाठीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी आणि या प्रक्रियेतून गेलेल्या उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे. या उमेदवारांना बाजूला सारणे आणि इतरांची नेमणूक करणे पूर्णपणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.