पाच कोटी लाभार्थींना दिवाळीपूर्वीच ‘गोड’ बातमी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने 2020-21 या चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) 8.50 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित पाच कोटींहून अधिक लाभार्थींना होणार आहे. अर्थ मंत्रालयाने यासंबंधीच निर्णय जाहीर केला असून ईपीएफओ खातेधारकांना दिवाळीपूर्वीच ‘गोड’ आणि आनंददायी बातमी मिळाली आहे. तथापि, व्याजाची रक्कम कधी जमा होणार यासंबंधी सध्या माहिती देण्यात आलेली नाही.
केंद्रीय कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीमध्ये व्याजदरासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वषीही हा व्याजदर 8.50 टक्के इतकाच होता. तो चालू आर्थिक वर्षासाठी स्थिर ठेवण्यात आला आहे. गेल्या वषी मार्चमध्ये, ईपीएफओने 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.50 टक्के कमी करत मागील सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला होता. त्यापूर्वीच्या म्हणजे 2018-19 साठी हा दर 8.65 टक्के होता. तसेच 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याजदर दिला होता. तर 2015-16 मध्ये व्याजदर 8.80 इतका होता. त्यापूर्वी 2013-14 तसेच 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याजदर दिला गेला होता.