चौगुले, सेझा गोवा-वेदान्त कंपन्यांच्या अधिकाऱयांसमवेत पोलिसांची बैठक
प्रतिनिधी / कुडचडे
सावर्डे मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून सेझा गोवा-वेदान्त कंपनी व चौगुले कंपनी यांनी ई-लिलावाच्या मालाची वाहतूक सुरू केलेली असून या वाहतुकीत बऱयाच प्रमाणात त्रुटी दिसून आल्याने तसेच लॉकडाऊनच्या काळात बऱयाच गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे असल्याने यासंबंधी दोन्ही खाण कंपन्यांच्या अधिकाऱयांची कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येऊन त्यांना त्यात सर्व माहिती देण्यात आली. तसेच सदर त्रुटी व्यवस्थितरीत्या दूर होण्यासाठी सांगे व धारबांदोडा उपजिल्हाधिकाऱयांच्या समवेत ताबडतोब बैठक घेऊन तोडगा काढावा असेही सांगण्यात आल्याची माहिती केपेचे पोलीस उपअधीक्षक किरण पौडुवाल यांनी दिली. सावर्डे मतदारसंघात अचानक खनिज मालवाहतूक सुरू झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाल्याने कुडचडे पोलीस स्थानकात सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीला सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, वल्लभ दळवी हेही उपस्थित होते.