उचगाव / वार्ताहर
उचगाव (ता. करवीर ) येथून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेली नूतन निलेश कांबळे ही दहा वर्षीय मुलगी रविवारी सकाळी शिरोली एमआयडीसी येथील पूजा आकाश नलवडे या ओळख असलेल्या महिलेच्या घरात सापडली. तब्बल 72 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुलगी सहीसलामत सापडल्याने पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीचा आजी सांभाळ करते. गुरुवारी दि.१८ पासुन दुपारी मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांची तारांबळ उडाली. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती मुलीचे अपहरण झाले असावे अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली . या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे ,पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील आणि गांधीनगरचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर ,पो.उ.नि. अतुल कदम, व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन दिवसापासून मुलीच्या शोधासाठी अथक प्रयत्न सुरू केले होते.
तपासासाठी सहा पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली होती . कर्नाटक सह कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र शोध पथक तपास करत होते. मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलीचा छडा लागला नव्हता. त्यामुळे या प्रकारची चिंता वाढली होती तपास अधिकारी यांनी परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदविले होते. तरीही कोणताही सुगावा हाती लागला नव्हता . दरम्यान रविवारी सकाळी वृत्तपत्रातील बातमी वाचून एकाने पोलिसांशी संपर्क साधला की मुलगी शिरोली येथे सुखरूप आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित मुलगी शिरोली एमआयडीसी येथील पूजा आकाश नलवडे यांच्या घरात आसऱ्याला गेल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथक शिरोली कडे रवाना झाले व त्या मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. चौकशी अंती आजीच्या घरातील कामाला कंटाळून आपण स्वतःहून घरातून बाहेर पडून पूजा नलवडे यांच्याकडे वास्तव्याला गेल्याची माहिती तिने दिली. पूजा नलवडे आणि त्यांच्या कुटुंबाची संबंधित मुलीशी ओळख आहे. गुरुवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यानंतर या मुलीला विशाल विजय कांबळे याने पूजा नलवडे यांच्या शिरोली एमआयडी येथील घरात सोडले होते. अशी माहिती सूत्रांनी दिली.यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बालकल्याणच्या सुधारगृहात सोडण्यात आले ची माहिती पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील आणि स.पो.नि दीपक भांडवलकर यांनी सांगितले.