छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमी जनतेचे दैवत
वार्ताहर /उचगाव
बेंगळूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी उचगाव आणि कल्लेहोळ गावांमधून शिवरायांच्या पुतळय़ास दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी या दोन्ही गावांतील मराठी बांधव तसेच युवावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी अशा जोरदार घोषणाबाजीने दोन्ही गावांतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गाव दणाणून गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार शुक्रवारी बेंगळूर शहरात घडला. ही घटना अतिशय निंदणीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून ते सकल हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोर शासन होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे ठराव दोन्ही गावांतील तमाम जनतेने शिवरायांच्या पुतळय़ास दुग्धाभिषेकप्रसंगी केले.