वार्ताहर /उचगाव
उचगाव ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र. 2 च्या पोटनिवडणुकीसाठे सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण मतदान 75 टक्के झाले.
एकूण अकराशे चौदा मतदानापैकी 856 मतदान झाले. बुथ क्रमांक 19 मध्ये 409 तर बुथ क्रमांक 19-ए मध्ये 456 मतदान झाले. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये अंजना जाधव यांचे निधन झाल्याने वॉर्ड क्रमांक दोनची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये भारती आप्पाजी जाधव व सुनीता शरद होनगेकर या दोन उमेदवारांमध्ये निवडणूक घेण्यात
आली.
सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली. सकाळच्या सत्रामध्ये मतदारांनी काही प्रमाणात गर्दी केली होती. दुपारी परत मतदान संथगतीने झाले. त्यानंतर सायंकाळी परत मतदारांनी काही प्रमाणात गर्दी करून आपले मतदान केले. सकाळपासून मतदानाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आले होते.
दुपारी काकती पोलीस स्थानकाचे सीपीआय आय. एस. गुरुनाथ यांनी मतदानाच्या ठिकाणी भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. सर्वांना मतदान शांततेत करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत उचगाव ग्रा. पं. चे अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य एल. डी. चौगुले, बंटी पावशे, ग्राम विकास अधिकारी वासू दत्त, तलाठी कोष्टी आदी उपस्थित होते. मतदानाचा निकाल 30 डिसेंबर रोजी लागणार आहे.