पद्मजा फेणाणी-जोगळेकर, -प्रसिध्द गायिकांचे विद्यार्थी गायकांना मार्गदर्शन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
चांगल्या गाण्यासाठी परिश्रम पाहिजे, त्यासाठी नियमित रियाज ही खूप महत्त्वाची बाब आहे. उत्तम गायक होण्याचा ध्यास घेतला पाहिजे. किती मोठा गायक होणार, ही बाब मात्र परमेश्वरावर सोडली पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रत्नागिरी येथील इन्फिगो नेत्ररुग्णालयात शुक्रवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गायकी शिकणाऱया रत्नागिरीतील निवडक 25 मुलांना बोलावण्यात आले होते. या मुलांसोबत गप्पांचा कार्यक्रम पार पडला. एखाद्या मोठय़ा कलाकाराशी जवळून भेटण्याची संधी रत्नागिरीतील मुलांना मिळाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमात लीना खामकर, अनुष्का देवरूखकर, आदित्य पंडित यांनी आपापल्या गाण्यांचे थोडके आविष्कार सादर केले. त्यांचे पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी कौतुक केले. प्रश्नांच्या उत्तरात त्या म्हणाल्या, रियाजाला खूप महत्त्व आहे. ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळी लवकर रियाज केल्यास उत्तम. पण त्यावेळी न जमल्यास दिवसभर योजना करून रियाज जमवायलाच हवा. त्या पुढे म्हणाल्या, पंडित जसराज यांच्याकडे त्यांनी गाण्याचे धडे गिरवले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडेदेखील गाणे शिकले. तानपुरा घेऊन तासन्तास साधनेचे महत्त्व गुरुंनी सांगितले. तहान लागली तरी त्याकडे दुर्लक्ष करून रियाज करण्याची शिस्त देखील पाळली गेली. सर्वांनी रियाज महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यावे.
त्यांनी आणखी सांगितले, घशाला त्रास होईल असे कोणतेही खाणे गायकाने टाळले पाहिले. अपवादात्मक स्थितीत खायचे असेल तर योग्य वेळ पाहून ते खाल्ले पाहिजे. मैफिलीच्या अगोदर मात्र कठोरपणे तळलेल्या किंवा थंड पदार्थांना नाही म्हटले पाहिजे. गायकाने आपले वजन मर्यादेत ठेवले पाहिजे. एकूणच प्रकृतीला योग्य वजन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गायकांनी हे लक्षात घेतले पाहिजे.