उत्तराखंडमध्ये आयुर्वेदिक चरक संस्थानच्यावतीने वनस्पतींमधील औषधी द्रव्यांच्या परीक्षणासाठी तसेच प्रयोगांसाठी 48 एकर जागेत मोठे उद्यान साकारत आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पात विविध औषधी वनस्पतींची एकत्रित लागवड केली जाणार असून त्यामुळे या सर्व वनस्पती, त्यांची पाने, मूळे, फुले, बिया, खोडे, फांद्या व इतर भाग एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. परिणामी संशोधकांना वेगवेगळय़ा वनस्पती शोधण्यासाठी भटकण्याची वेळ येणार नाही. आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनासाठी ज्या वनस्पती विशेषत्वाने उपयोगात आणल्या जातात, त्यांची लागवड तसेच अत्यंत दुर्मीळ असणाऱया वनस्पतींची लागवडही या उद्यानात केली जाणार आहे.
सात ते आठ टप्प्यांमध्ये या उद्यानाची रचना केली जाणार असून दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत. येथे 500 हून अधिक वनस्पती प्रजातींची लागवड केली जाईल. आतापर्यंत 10 एकर भूमी अशाप्रकारे विकसित करण्यात आली आहे. विविध रोगांच्या लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार केल्या जाणाऱया आयुर्वेदिक वनस्पतींची वर्गवारी केली गेली आहे. गुडूची, हरडा, सुंठ, आवळा, वेलदोडा, दालचिनी, जिरे, पुदिना, तुळस, गवती चहा, नारळ, आंबा, पपई, अंजीर, बेल, खजूर, चिकू इत्यादी विविध प्रकारच्या वनस्पती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
औषधी भाज्यांचीही लागवड होणार असून त्यात मेथी, पालक, कोथिंबिर, कारले इत्यादींसह भारताच्या विविध वनांमध्ये सापडणाऱया दुर्मीळ वनस्पतींचीही लागवड केली जाणार आहे.