ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात पहिल्याच पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. मागील काही तासांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा आणि मंदाकिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलकनंदा नदी 627 तर मंदाकिनी 626 मीटरवर वाहताना दिसत आहे. मूळ पातळीपेक्षा ही पातळी दोन मीटर अधिक आहे. ऋषिकेशमध्येही गंगा नदीची पातळी धोक्याच्या निशाणापर्यंत म्हणजेच 340.34 मीटरवर आल्याने प्रशासनाने अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मान्सूनच्या सुरुवातीलाच उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील अडचणी वाढल्या आहेत. पिथौरागढ आणि चमोली यांसारख्या सीमान्त जिल्ह्यासोबत ऋषिकेशमध्येही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातील कंट्रोल रुमकडून ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पिथौरागढमध्ये धौलगंगासहीत शरयू आणि काली नद्यांनाही पूर आल्याने शुक्रवारपासून घाट राष्ट्रीय महामार्ग ठप्प आहे. तर चमोलीमध्ये बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक प्रभावित झाली होती.
धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचलेल्या या भागातील नद्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी या भागात जलप्रलय दिसून आला होता. यामध्ये 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.