ऑनलाईन टीम / देहरादून :
त्रिवेदी सरकारकडून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये आणखी दोन योजनांचा समावेश केला आहे.
यामध्ये शहरी भागात ‘फेरी व्यवसाय (फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी) योजना’ आणि सहकारी विभागाच्या मदतीने ‘मोटारसायकल टॅक्सी योजना’ सुरू केली जाणार आहे. सरकारच्या मते या दोन्ही योजनांमुळे 70 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील.
शहरी विकास विभगाकडून मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेच्या अंतर्गत प्रदेशातील 92 नगर निगम, नगरपालिका आणि नगर पंचायतीमध्ये ‘नगरी फेरी व्यवसाय योजना’ सुरू केली जाणार आहे. यामध्ये डेअरी, ठेला, फेरी विक्रेता, डोक्यावर सामान घेऊन विक्री करणाऱ्यांना गॅरंटीशिवाय लोन दिले जाणार आहे. तसेच सरकार कडून व्याज दरात दोन टक्क्यांची सबसिडी देण्यात येईल.
सहकारी विभागाच्या मदतीने ‘मोटारसायकल टॅक्सी योजना’ सुरू केली जाणार असून या योजनेअंतर्गत जिल्हा सहकारी बँकेमार्फत मोटारसायकल टॅक्सीसाठी 60 हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. या कर्जांचा कालावधी तीन वर्षांचा असेल. त्यातील पहिल्या दोन वर्षांचे व्याज सरकार भरणार आहे. तसेच या योजनेमुळे जवळपास 20 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.