ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन कोमात आहेत. त्यामुळेच देशाची धुरा त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळत आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी तेथील स्थानिक मीडियाला दिल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.
काही दिवसांपूर्वीच किम जोंग यांच्या प्रकृती अस्वास्थाबाबत आणि त्यांच्या निधनाबाबतचे वृत्त मीडियाने प्रसिद्ध केले होते. मात्र, नंतर किम जोंग प्रसारमाध्यमांसमोर आल्याने ते वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता हाती आलेल्या या वृत्ताबाबत साशंकता वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी म्हटले आहे की, किम जोंग हे कोमात आहेत. उत्तर कोरियात किम जोंग यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड झाली नसल्याने त्यांची बहीण किम यो जोंग यांना पुढे आणले जात आहे. हे पद जास्त काळ रिक्त ठेवणे शक्य नसल्याने किम यो जोंग कारभार सांभाळत आहेत.