प्रतिनिधी/ सातारा
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क हा विभाग आहे. याच विभागामध्ये बरीच माया गोळा करण्याचा करेक्ट कार्यकम सर्रास सुरु असतो. दारुच्या दुकानातून वा बिअर शॉपीतून अमाप माया दारु दुकानदारांना मिळते. त्या पार्श्वभूमीवर दुकानाचा परवाना काढायचा असेल किंवा दारु पिण्याचा परवाना मिळवायचा असल्यास या विभागाच्या कार्यालयामध्ये रेट ठरलेले आहेत. त्याप्रमाणे जर खिसा गरम असेल तर अधिकारीही लगेच नरम होऊन पटकन काम होते. स्वतःचेच उत्पादन वाढवण्यामागे या विभागातील अधिकारी दंग असून नुकतेच साडपलेले तीन जण हे हिमनगाचे टोक आहे.
सरकारी कार्यालयात जाऊ तेथे खाऊ या उक्तीप्रमाणे खेळ सुरु असतो. तसाच खेळ राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात सुरु आहे. एकतर हे कार्यालय आडबाजूला गोडोली येथे आहे. कोण पहायला येत नाही याचाच गैरफायदा या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी घेतात. गेल्या तीन दिवसांपूर्वी तीन लाख रुपयांची लाच घेताना सापडले हे केवळ हिमनगाचे टोक आहे. या विभागात बहुतांशी भ्रष्टाचाराची साखळीच असून कोणी किती घ्यायचे, कोणाला किती वाटा द्यायचा याचेच ठरवाठरवी झालेली असते. सध्या बिअर शॉपी, सरकारमान्य दारुच्या दुकानाच्या परवान्यासाठी तीन लाखापासून दहा लाखापर्यंतचा रेट आहे तर दारुच्या पिण्याच्या परवान्यासाठी तब्बल पाच हजारपासून पुढे माणसाचा जसा पेहराव असेल तेवढी मागणी केली जाते. त्यामुळे पैसे मागणी करताना लायन्सन काढायला आलेला व्यक्ती कसा आहे त्याचे फेसरिडींग पाहूनच त्याच्याकडे मागणी केली जाते. नाही तर त्याला विविध कारणे सांगून परवान्यासाठी हेलपाटे मारायला लावले जाते. असा उफराटा कारभार राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यक्रम सुरु आहे.
काळभोर हा शातिर
काळभोर यांच्याबरोबर अन्य दोघांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने पडकले आहे. यातील काळभोर हे अतिशय हुशार म्हणून त्यांची चर्चा आहे. तो साहेबांचा राईट हॅण्ड म्हणून समजला जातो. सगळे देवाणघेवाण करायची असल्यास त्यांच्याकरवीच होते अशीही जोरदार चर्चा आहे.
चौकट
ज्यांचा खिसा गरम त्यांच्यापुढे साहेब होतोय नरम
तसे पहाता दारुपासून राज्याला उत्पादन मिळवून देणारे हे खाते असले तरीही त्या खात्यात भ्रष्टाचार कसा करायचा आणि आपल्या कर्मचाऱयांना एकप्रकारे प्रशिक्षणच आपोआप मिळते. शासनाकडून भरमसाठ पगार मिळत असून वरकमाई ही हवीच असते. राज्यातील या विभागातील कर्मचाऱयांची व त्यांच्या नातेवाईंकांची संपत्ती पाहिली तर आपोआपच तोंडात बोटे जातील. भरती झाल्यापासून पाच ते सहा वर्षात इमला बांधतात. अलिशान कार अन् बुलेटचा मोठा थाटही असतो.
ऍन्टीकरप्शन ब्युरोकडे तक्रार करावी
भ्रष्टाचार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जो भ्रष्टाचार करणारा गुन्हेगार असतो तसाच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा, पैसे देणाराही तेवढाच जबाबदार असतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात कोणी जर पैशाची मागणी करत असेल तर ऍन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार करा.