प्रतिनिधी/ वाई
आनेवाडी (ता. वाई) टोलनाका येथील टोल हस्तांतरण आंदोलन प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या इतर अकरा समर्थकांची वाई न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केला.
दि. 5 ऑक्टोबर 2017 रोजी संध्याकाळी सहा वाजता आनेवाडी टोलनाका येथे खासदार उदयनराजे भोसले, अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले, सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुऱहाडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
आनेवाडी टोल नाका येथे अडीचशे जणांचा बेकायदेशीर जवळचा जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा व टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही, असे बोलून टोल हस्तांतरणास विरोध केला होता. यावेळी टोल नाक्यावर टोलनाका हस्तांतरणावरुन टोलवसुली हस्तांतरावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. टोलनाका परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. यावेळी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याबाबत भुईंज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी वाई येथील न्या. एम. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले.
अंतिम सुनावणीनंतर उदयनराजे व त्यांच्या अकरा सहकाऱयांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी शुक्रवारी न्यायालयात खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकार पक्षाच्यावतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्यावतीने ऍड. ताहेर मणेर यांनी काम पाहिले.