राज्याध्यक्ष पी. आर. पाटील यांचे गौरवोद्गार कलाशिक्षकांना हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागणार नाही ! राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे मालवणात उद्घाटन .
प्रतिनिधी / मालवण :
गेल्या पाच वर्षांत कला शिक्षकाला शाळेतूनच बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केले जात होता. कला शिक्षकांना वारंवार आंदोलन करून आपला हक्का अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र, आता संघर्ष करण्याचे दिवस संपले आहेत. उद्धव ठाकरे हे कलेची जाण असणारे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता कला शिक्षकांची शाळेतील हक्काची जागा निश्चित होण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. शासन बदलल्याने कलाशिक्षण परिषदेतील सहभागी शिक्षकांना तीन दिवसांची अधिकृत रजा मंजूर करण्यात आली आहे. कला शिक्षकांनाही इतर शिक्षक संघटनांप्रमाणेच सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे, असे प्रतिपादन राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या पुढाकारातून आयोजित 41 व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. विधानपरिषद आमदार तथा शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, युवराज दत्त, दादा भगाटे, एम. ए. कादरी, नरेंद्र बारई, हिरामण पाटील, सौ. प्रियंवदा तांबोटकर, प्रसाद राणे, प्रकाश महाभोज, समीर चांदेरकर, संभाजी कोरे, विवेकानंद सावंत, एल. के. सावंत, एस. के. पेडणेकर, एस. बी. कांबळे, वाय. एस. गावित, व्ही. के. मेस्त्राr, टी. ए. कुबल, आर. व्ही. कोयंडे, मंदार चोरगे, बी. जी. सामंत, एस. डी. माळी, संदीप साळस्कर, एस. टी. कुंभार, जिल्हाध्यक्ष रुपेश नेवगी, बबन शिंदे, हरी खोबरेकर, मंदार केणी आदी उपस्थित होते. राज्य कलाध्यापक संघातर्फे ज्येष्ठ चित्रकार बी. जी. गिरकर यांना जीवनगौरव पुरस्कार, 2019-20 चा कलातपस्वी पुरस्कार कलाशिक्षक बी. जी. सामंत यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या परिषदेसाठी राज्यातील 36 जिल्हय़ांतून कलाशिक्षक सहभागी झाले आहेत.
तंत्रज्ञान युगाची किल्ली चित्रकारांच्याच हाती!
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून पाहिले जाते. मात्र, या युगाची गुरुकिल्ली ही चित्रकार आणि प्रतिभावंतांच्याच हाती आहे. तरीही आज कलाशिक्षकांना शाळेत मिळत असलेली वागणूक वेदनादायी ठरत आहे. शिक्षणाचीच पॉलिसी कला शिक्षकांना मुळ हेतूपासून दूर करणारी आहे. एक कलाकारच आपल्या शैलीतून आदर्श विद्यार्थी घडवू शकेल. तरीही कलाशिक्षकांसाठी शाळेत चार तासही देणे शिक्षण व्यवस्थेला अडचणीचे ठरत असेल, तर ती मोठी शोकांतिका आहे. कलाशिक्षकांनी आपली एकजूट कायम ठेवून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा द्यावा, असे चित्रकार अरुण दाभोलकर यांनी सांगितले.
कलाशिक्षकांचे प्रश्न सोडविणार – वैभव नाईक
कलाशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. सिंधुदुर्गातील अनेक शाळांना 100 वर्षांचा इतिहास आहे. अशा शाळांमध्ये कलाशिक्षक आवश्यक आहे. कौशल्य विकासासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना कला शिक्षकांप्रती शासनाची असलेली भूमिका बदलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात येईल, असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. विद्यार्थी घडविणाऱया शिक्षकांची परिषद मालणात होत असल्याने याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालवण पालिका सहकार्य करेल, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रुपेश नेवगी यांनी केले. सुत्रसंचालन सुशांत पवार व गणेश गावकर यांनी केले. आभार जिल्हा सचिव समीर चांदेरकर यांनी मानले.
आज चिवला बीच येथे वाळूशिल्प प्रात्यक्षिक
7 रोजी सकाळी 7 ते 10 वा. चिवला बीच येथे वाळूशिल्प प्रात्यक्षिक. 11 वा. पुरस्कार वितरण सोहळा, दुपारी 12 ते 1 वा. निवृत्त कलाशिक्षक पुरस्कार व मानपत्र वितरण, दुपारी 2 ते 3 वा. दशावतार मेकअप प्रात्यक्षिक, दशावतार माहिती व सादरीकरण, सायं. 5 ते 6 वा. प्रात्यक्षिक व मार्गदर्शन-जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, 6 ते 7 वा. पुरस्कार वितरण सोहळा, 7.30 ते 9.30 वा. लोककला माहिती व सादरीकरण (नेरुर शिमगोत्सव, कापड खेळे, वारकरी भजन नृत्य).
पाच वर्षात शिक्षणाचा ‘विनोद!’
गेल्या पाच वर्षात शिक्षण विभागाचा कारभार म्हणजे ‘विनोद’ होता, अशा शब्दात डॉ. मनीषा कायंदे यांनी तत्कालीन शिक्षणमंत्र्यांवर टीका केली. कलाध्यापक शिक्षकाचा दर्जाच काढून घेण्याचे पाप या कालावधीत करण्यात आले. कलाशिक्षकांचा विशेष दर्जा काढून सामान्य शिक्षक बनविण्यात आले. शाळेतील कलेचा तास कमी करण्याचा प्रताप करण्यात आला. त्यामुळे कला शिक्षक प्रचंड दडपणाखाली आले होते. आता असे होणार नाही. कला शिक्षकांचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण पाठपुरावा करू. इतर शिक्षक संघटनांप्रमाणे कला शिक्षकांनाही सन्मान आणि परिषदेसाठी शासनाकडून आवश्यक सुविधा मिळण्याचा हक्क आहे. यापुढे शासनस्तरावरील कला शिक्षकांची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.