खबरदारीचे आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात सात जूनपर्यंत गडगडाटासह पाऊस पडणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हावासीयांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात जिल्हय़ात एकूण 41 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये दोन पक्की घरे पूर्णत:, तर 23 पक्की आणि 16 कच्ची घरे यांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच 173 विद्युत खांब पडल्याने वीज वितरणचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. 36 ठिकाणची दूरध्वनी सेवा कोलमडली, तर चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचेही अंशत: नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. मात्र या नुकसानीची आकडेवारी अद्याप प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्हय़ात 16.82 मि. मी. च्या सरासरीने 134.6 मि. मी. पाऊस झाला आहे. तर 1 जूनपासून आतापर्यंत 190.06 मि. मी. च्या सरासरीने 1520.6 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.