पुणे विभागातील तहसिलदार, उपजिल्हाधिकाऱयांच्या बदल्या : भुदरगड प्रांताधिकारी खिलारी यांना मुदतवाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसिलदार अमोल कदम यांची बदली झाली. तर भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांना मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली. मंत्रालयातून महसूल उपसचिव डॉ. माधव वीर यांनी शुक्रवारी हे बदल्यांचे आदेश काढले.
पुणे विभागातील बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये कोल्हापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश धुमाळ यांची सातारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रं.16), उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांची सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रं. 11), गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. त्यांच्या जागेवर सांगलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रं. 9) बाबासाहेब वाघमोडे यांची बदली झाली. वाघमोडे यांनी यापूर्वी करवीर तहसिलदार म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर यापूर्वी कोल्हापूरात काम केलेल्या उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, स्नेहल भोसले, शैलेश सूर्यवंशी, विक्रांत चव्हाण यांच्याही बदल्या झाल्या आहेत.
भुदरगडचे तहसिलदार अमोल कदम यांची कोरेगाव (जि. सातारा) येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सांगलीच्या तहसिलदार अश्विनी वरुटे यांची बदली झाली आहे. गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगलीचे तहसिलदार (सर्वसाधारण) रामलिंग चव्हाण यांची बदली झाली आहे. जावळीचे (जि. सातारा) तहसिलदार शरद पाटील यांची इचलकरंजी येथे अपर तहसिलदार म्हणून बदली झाली आहे. तसेच यापूर्वी कोल्हापूर जिह्यात काम केलेल्या तहसिलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये रणजीत देसाई, रणजीत पिसाळ, सुनील शेरखाणे, चंद्रशेखर सानप यांचा समावेश आहे.
———-