निवासी मालमत्तांचा दर 2320 रुपये तर व्यापारी मालमत्तांचा दर 3248 रुपये प्रति चौ. फुट : जाधवनगर, शिवबसवनगर, हनुमाननगर, विरभद्रनगर पाठोपाठ
गंगाधर पाटील / बेळगाव
बेळगाव शहरातील मालमत्तांचे बाजारमूल्य गगनाला भिडत असताना नागरिकांनी आपला मोर्चा उपनगरांकडे वळविला. मध्यवर्ती शहरात जागा आणि इमारती महागडय़ा झाल्याने स्वतंत्र जमिनी खरेदी करुन उपनगरे वसविण्यात आली. मात्र शहराचेच अविभाज्य अंग बनलेल्या या उपनगरांची परिस्थिती आता शहराप्रमाणेच झाली आहे. सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि सोयींमुळे उपनगरांचे महत्वही वाढत आहे. शहराच्या आसपास 25 हून अधिक उपनगरे असून त्यातील आठ ते दहा उपनगरे महत्वाची ठरत आहेत. या सर्व उपनगरांमध्ये दराच्या बाबतीत नेहरुनगर आघाडीवर असून त्या पाठोपाठ जाधवनगर, शिवबसवनगर, हनुमाननगर आणि विरभद्रनगर येथील मालमत्तांचे दर येतात.
नेहरुनगर येथील निवासी मालमत्तांचे दर 2320 रुपये प्रति चौ. फुट झाले आहेत. येथील व्यापारी मालमत्तांचे दर 3248 रुपये प्रति चौ. फुट आहेत. यापाठोपाठ जाधवनगर येथील निवासी मालमत्ता प्रति चौ. फुटास 2270, विरभद्रनगर येथील निवासी मालमत्ता 1870 रुपये असे दर पहायला मिळतात. हनुमाननगर येथील निवासी मालमत्तांचा दर 1980 रुपये तर शिवबसवनगर येथील निवासी मालमत्ता प्रति चौ. फुटास 2110 रुपयास जावून पोहोचल्या आहेत.
व्यापारी मालमत्तांच्या बाबतीत विचार केल्यास शिवबसवनगर 3 हजार 400, नेहरुनगर 3248, जाधवनगर 3178, विरभद्रनगर 2960 तर हनुमाननगर 2772 प्रति चौ. फुट असे दर पहायला मिळतात. नेहरुनगर आणि शिवबसवनगर ही एकमेकाला जोडलेली उपनगरे आहेत. या ठिकाणी निवासी मालमत्तांचे दर काही प्रमाणात समानच आहेत. दरम्यान नेहरुनगरच्या तुलनेत शिवबसवनगर येथील व्यापारी मालमत्ता महागडय़ा ठरत आहेत. या भागात शाळा, महाविद्यालये, रिसर्च सेंटर्स आणि इतर व्यावसायिक उपक्रम मोठय़ा प्रमाणात राबविले गेल्याने मागील 15 ते 20 वर्षांत येथील जागांचे दर वाढले आहेत.
या नगरांसह विश्वेश्वरय्यानगर, रेलनगर निवासी मालमत्ता 2000 रुपये प्रति चौ. फुट तर व्यापारी मालमत्ता 2800 रुपये प्रति चौ. फुट आहेत. सदाशिवनगर रहिवासी मालमत्तांचे दर 1900 रुपये तर व्यापारी जागांचे दर 2660 रुपये प्रति चौ. फुट आहेत. याचबरोबर गांधीनगर रहिवासी मालमत्ता 1700 रुपये तर व्यापारी मालमत्ता 2380 रुपये प्रति चौ. फुट आहेत. शिवाजीनगर रहिवासी मालमत्तांचा 2530 रुपये आणि व्यापारी मालमत्तांचा दर 2420 रुपये प्रति चौ. फुट आहेत. वैभवनगर निवासी मालमत्तांचा दर 1870 आणि व्यापारी मालमत्तांचा 2960 रुपये प्रति चौ. फुट झाले आहेत.
हिंडलगा-विजयनगर रहिवासी मालमत्ता 1590 रुपये तर व्यापारी मालमत्ता 2226 रुपये प्रति चौ. फुट आहेत. अंजनेयनगर रहिवासी मालमत्तांचे दर 1710 तर व्यापारी मालमत्ता 2 हजार 400 रुपये प्रति चौ. फुट, अशोकनगर रहिवासी मालमत्ता 1440 तर व्यापारी मालमत्ता 2016 रुपये, सुभाषनगर 1530 रहिवासी मालमत्ता तर 2142 व्यापारी मालमत्तांचे दर प्रति चौ. फुट आहेत. लक्ष्मी टेकडी या परिसरातही जागांच्या किंमती वाढल्या असून रहिवासी मालमत्तांचे दर 2050 तर व्यापारी मालमत्तांचे दर 2870 रुपये प्रति चौ. फुट मुद्रांक आणि नोंदणी खात्याने निश्चित केले आहेत.
टि.व्ही.सेंटर परिसरात रहिवासी मालमत्तांचे दर 2140 रुपये तर व्यापारी जागांचे दर 3 हजार रुपये, न्युगांधीनगर रहिवासी मालमत्तांचे दर 1050 रुपये, व्यापारी मालमत्तांचे दर 1470 रुपये प्रति चौ. फुट आहेत. अशा प्रकारे उपनगरांच्यामधील जमिनींचे दर वाढले असून शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये असलेल्या सर्वच नगरांचा विस्तार झपाटय़ाने वाढत चालला आहे. त्याचबरोबर जमिनींचे दरही वाढत चालले आहेत. शहरामध्ये जमिनी मिळत नसल्यामुळे उपनगरांकडेच ओढा वाढला असून उपनगरांचेही दर वाढत चालले आहेत.
मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाने हे दर निश्चित केले असून आणखी एक वर्षानंतर पुन्हा या दरांमध्ये वाढ होणार आहे. प्रत्यक्षात हे दर ठरविले तरी यापेक्षा अधिक दराने खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. मात्र नोंदणी विभागाने निश्चित केलेल्या दरावरच प्रत्येकाकडून कर आकारला जात आहे.
बेळगाव उपविभाग | ||
मिळकतीचे बाजारमूल्य (प्रति. चौ. फूटामध्ये) | ||
विभाग | निवासी | व्यापारी |
नेहरुनगर | 2320 | 3248 |
शिवबसवनगर | 2100 | 3400 |
जाधवनगर | 2270 | 3178 |
विरभद्रनगर | 1870 | 2960 |
हनुमाननगर | 1980 | 2772 |
लक्ष्मी टेकडी | 2050 | 2870 |
अंजनेयनगर | 1710 | 2400 |