कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी शहरातील झेरॉक्स सेंटरवर गर्दी : चव्हाट गल्ली कॉर्नरवर वाहनांच्या रांगांमुळे रस्ता बंद
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. कोण अर्ज भरणार, कोण कोणाशी लढणार याबाबतच्या चर्चा गावपातळीवर सुरू आहेत. मात्र, अर्ज भरण्यासाठी लागणाऱया कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी न्यायालय आवारात गर्दी वाढत आहे. निवडणूक लढविणाऱया इच्छुकांमुळे झेरॉक्स सेंटरवर गर्दी झाली होती. वाहनांच्या पार्किंगमुळे चव्हाट गल्ली कॉर्नर येथील रस्ता बंद झाला होता.
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिकडे तिकडे ग्राम पंचायत निवडणुकीचीच चर्चा असून, ओल्या पाटर्य़ांना जोर वाढला आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असल्याने गावागावात चर्चांना ऊत आला असून, कोणत्या वॉर्डमधून कोण निवडणूक लढविणार याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. पण ग्रामपंचायत निवडणुका गावात असल्या तरी शहरातदेखील गर्दी वाढत आहे. अर्ज भरण्यासाठी लागणाऱया कागदपत्रांची जमवाजमव करण्यास इच्छुक उमेदवार शहराकडे धाव घेत आहेत. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति काढणे, अर्जासोबत दाखल्यांची जमवाजमव करणे, अर्ज भरून घेणे आदी कामासाठी न्यायालय आवारातील आणि कचेरी रोड भागातील झेरॉक्स व टायपिंग सेंटरवर इच्छुकांची गर्दी होत आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने कागदपत्रे जोडणीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. छाननीवेळी अर्ज अवैध होऊ नये याकरिता उमेदवार दोन अर्ज भरतात. त्यामुळे कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति काढाव्या लागत आहेत. परिणामी झेरॉक्स सेंटरवर गर्दी होत आहे.
वाहतूक कोंडीचा सामना
बुधवारी दुपारी न्यायालय आवारातील झेरॉक्स सेंटरवर इतकी गर्दी झाली होती की, पादचाऱयांना ये-जा करण्यासाठीदेखील रस्ता नव्हता. चव्हाट गल्लीमधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱया वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. चव्हाट गल्ली कॉर्नरपासून जिल्हा पंचायत कार्यालयाकडे जाणाऱया संपूर्ण रस्त्यावर दुचाकी वाहने पार्क करण्यात आली होती. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. सध्या निवडणुकीच्या धामधूममुळे झेरॉक्स सेंटरचे भाव वधारले आहेत. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे उमेदवारांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने इच्छुक शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळेच न्यायालय आवारासह कचेरी रोडवर गर्दी वाढत आहे.