प्रतिनिधी/ मडगाव
गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी काल रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या प्रमुख श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवून दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर टिका केली आहे.
उर्फान उर्फ बबलू मुल्ला हे पेशाने शिक्षक असून दवर्ली येथील अंजूमन हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली 20-25 वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर आवाज उठविला होता. अनेक आंदोलनात ते सहभागी झाले होते. मात्र, हल्ली पक्षाने जे काही धोरण राबविले आहे ते पक्षाला मारक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
सांताप्रुझ मतदारसंघात रूडोल्फ फर्नांडिस यांना पक्षात घेतल्याने ते काहींसे नाराज झाले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त पक्षासाठी कार्य करायचे व पक्षाच्या नेत्यांनी भलत्याच लोकांना उमेदवारी द्यायची, हा पक्षाचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे श्री. मुल्ला हे खंदे समर्थक मानले जात होते.
प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या उर्फान मुल्ला यांनी अद्याप इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, आपल्या समर्थकांकडे बोलणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.