वार्ताहर /उसगाव
उसगाव ग्रामपंचायतीतर्फे कचरा व्यवस्थापन सुविधा, सौर उर्जा युनिट, सुशोभीकरण केलेली पार्किंगची जागा व वीज खात्यासाठी कार्यालय अशा विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआरएफ कंपनीचे सरव्यवस्थापक गौतमराज, उद्योजक तथा समाजसेवक सागर केळुसकर, सरपंच अस्मिता गावडे, उपसरपंच गुरुदास गावडे, पंचसदस्य रामनाथ डांगी, तुळशीदास प्रभू, दिनेश तारी, संगीता गावकर व सीमा मास्कारेन्हास हे व्यासपीठावर उपस्थित होते.
उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, मुरगांव गट विकास अधिकार व स्वयंपूर्ण मित्र प्रसिद्ध नाईक, फोंडाचे गटविकास अधिकारी अश्विन देसाई यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी सिनीयर सिटिझन, युडीआय व मनरेगा कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱयांना माडावर चढण्यासाठी उपयुक्त असलेल्या उपकरणासंबंधी पत्रे वितरीत करण्यात आली. उसगाव पंचायत क्षेत्राच्या विकासात योगदान दिलेले प्रसिद्ध नाईक यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन पंचायतीतर्फे सन्मान करण्यात आले.
यावेळी बोलताना गौतमराज म्हणाले, उसगाव भागाला पंचसदस्यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्त्व लाभले आहे. उसगावच्या विकासाबाबत पंचायतीचा नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो. एमआरएफ कंपनीचे सदोदीत सहकार्य लाभणार असून गावच्या विकासासाठी हातभार लावणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. उसगाव आदर्श गाव होण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंचसदस्य तुळशीदास प्रभू म्हणाले, उसगावच्या विकासात शासकीय पातळीवर गटविकास अधिकारी म्हणून व उसगावचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून प्रसिद्ध नाईक यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचा दूरदृष्टीपणा व काम करण्याची पद्धत यामुळे अनेक विकासकामे झपाटय़ाने पूर्ण झाली आहेत. एमआरएफ कंपनीची अनेक प्रकल्पात फार मोठे मदत लाभली. पंचायत मंडळाने गेल्या साडेचार वर्षांत अनेक विकासकामे पूर्ण केली असून सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले.
ओला कचरा प्रकल्पाची पायाभरणी झाली असून आपत्कालीन व्यवस्थापनातर्फे रु. 60 लाख खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने पायाभूत साधनसुविधा उभारण्यासाठी पंचायतीला रु. 50 लाखांची मदत केली आहे. शिवाय कचरा व्यवस्थापन सुविधेसाठी एमआरएफ कंपनीने रु. 25 लाखांची मदत केली आहे. पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत सौर उर्जा युनिट बविण्यात आला आहे. त्याद्वारे 55 युनिट वीज निर्मिती होईल. सध्या पंचायतीला 50 युनिट विजेची गरज भासते. उर्वरीत 5 युनिट व सुट्टीच्या दिवशी निर्माण होणारी अतिरिक्त वीज, वीज खात्याला दिली जाईल अशी माहिती पंचसदस्य रामनाथ डांगी यांनी दिली.
यावेळी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत अवंतीनगर तिस्क उसगाव येथील जय भवानी स्वयंसाहाय्य गटाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक ताकवडा उसगाव येथील सत्यम स्वयंसाहाय्य गटाला तर तृतीय अवंतीनगर तिस्क उसगाव येथील नारीशक्ती स्वयंसाहाय्य गटाला मिळाले. त्यांना अनुक्रमे रु. 5000, रु. 3000 व रु. 2000 अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या 39 स्वयंसाहाय्य गटांना प्रत्येकी रु. 1000 देण्यात आले. टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेत नाणूस येथील तनिष्का गावडे हिला प्रथम, धावशिरे येथील सानिका सालेलकर हिला द्वितीय तर नाणूस येथील चंद्रकला गावडे हिला तृतीय पारितोषिक मिळाले. अस्मिता गावड यांनी स्वागत केले. रामनाथ डांगी यांनी सूत्रसंचालन तर गुरुदास गावडे यांनी आभार मानले.