पिंपळगाव / वार्ताहर
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा चढातीला चालकाचा ताबा सुटल्याने मशिनसह ट्रॉली घसारतीला बराच अंतर पाठीमागे जाऊन रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या एका ट्रॅक्सवर पलटी झाली. दोनपैकी एका ट्रॉलीतील सर्व ऊस ट्रॅक्सवर पडल्याने ट्रॅक्सचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना पिंपळगाव (ता.भुदरगड )येथील एस. टी. स्टँडनजीक घडली. चालकाचा रस्त्यावर स्टंट करून ट्रॅक्टर उचलण्याच्या नादात हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
हसुरचंपू येथून शेतातील दोन ट्रॉल्या ऊस भरून ट्रॅक्टर कारखान्याकडे जात होता. पिंपळगाव येथे एस.टी. स्टँडनजीक असलेल्या चढातीला आला असताना अचानक चालकाचा मशिनवरील ताबा सुटल्याने दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर पाठीमागे घसारतीच्या दिशेने जाऊ लागला. त्यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. एका मोटरसायकलला घासून जाऊन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रॅक्सवर दोनपैकी पुढील बाजूची ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली.त्यामुळे ट्रॅक्सचे सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. एका ट्रॉलीतील ऊस सर्वत्र रस्त्यावर पडला होता. सुदैवाने ट्रॅक्टर पाठीमागे येत असताना रस्त्याच्या आजूबाजूचे लोक पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात घडताच ट्रॅक्टरचालक ग्रामस्थ मारतील या भीतीने पळून जाऊन बराच वेळ एका शेतातील ऊसात लपून बसला होता.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऊस वाहतूक केली जाते. ट्रॅक्टरचालक मोठ्या डॉल्बीच्या आवाजात टेपरेकॉर्डर लावून ऊस वाहतूक करत असतात.येथील एस. टी. स्टँडनजीक चढातीला मशीन उचलून स्टंट करत असताना हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.