प्रतिनिधी /पणजी
श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्यांच्या कृपाछत्राखाली गोमंतक संस्कृतोत्तेजक मंडळ व घनपारायण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शांकर पाठशाळेच्या प्रांगणात 12 जानेवारीपासून पाठशाळेचे विद्यार्थी रामचंद्र (उपेंद्र) विवेक पाटील यांचे घनपाठी वे. मू. योगेश्वर मनोहर बोरकर यांच्या पर्यवेक्षणाखाली कंठस्थ ऋग्वेद घनपारायण सुरू आहे. या पारायणाचा समारोप सोहळा बुधवार दि. 16 रोजी होणार आहे.
या निमित्त मंगळवार दि. 15 व बुधवार दि. 16 रोजी मुख्य अतिथी म्हणून संत साहित्याचे अध्यापक धनंजय चितळे तसेच अध्यक्षस्थानी स्वांगस्वाध्याय भास्कर वे. मू. दिनकर फडके गुरुजी उपस्थित रहाणार आहेत.
15 रोजी सायंकाळी 5 वा. धनंजय चितळे यांचे शांकर पाठशाळेत आगमन होईल. 6 वा. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर चितळे यांचे प्रवचन, त्यानंतर मंदिरात आचार्यांची आरती, मंत्रपुष्प प्रसाद वितरण होईल. 16 रोजी सकाळी 9 ते 11.30 वा. पर्यंत पारायण व समाप्ती, सायंकाळी 5 वा. ऋग्वेद घनपारायण सोहळा समारोप कार्यक्रम सुरू होईल. यावेळी मंगलाचरण, दीपप्रज्वलन, विद्वानांची मनोगते तसेच रामचंद्र पाटील यांचा गौरव, तद्नंतर धनंजय चितळे यांचे प्रबोधन, वे. मू. घनपाठी दिनकरभट्ट फडके गुरुजी यांचे अध्यक्षीय भाषण होईल. 7 वा. मंदिरात आचार्यांची आरती, मंत्रपुष्प व प्रसाद वितरण होईल. दोन्ही दिवशी कार्यक्रम समाप्तीनंतर कार्यस्थळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात आवश्यकतेनुसार थोडा बदल होऊ शकतो.