क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
इथॅन वाझचा पराभव करून ऋत्विज परबने सालसेत तालुका बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऍड. पुरुषोत्तम कंटक ब्लित्झ अखिल गोवा खुली ऑनलाईन स्पर्धा जिंकली. एकूण 25,000 रकमेची बक्षीसे या स्पर्धेत वितरीत करण्यात आली. स्पर्धेत आपली जबरदस्त छाप पाडताना ऋत्विजने खेळलेल्या सर्व सामन्यांत विजय नोंदविला.
तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या फिडे मास्टर नितीश बेलुरकरला या स्पर्धेत दुसरे स्थान मिळाले. त्याचा पार्थ साळवीविरूद्धचा शेवटचा लीग सामना बरोबरीत सुटला. त्यापूर्वी झालेल्या लढतीत ऋत्विजने नितीशचा पराभव केला होता. तिसऱया फेरीत अनिरुद्ध पार्सेकरचा पराभव करून बार्देश तालुका संघटनेच्या मंदार लाड याला तिसरे, श्रीलक्ष्मी कामतला चौथे, नीरज सारीपल्लीला पाचवे, शेन ब्रागांझाला सहावे, पार्थ साळवीला सातवे, अनिरुद्ध पार्सेकरला आठवे, जॉय काकोडकरला नववे तर इथॅन वाझला दहावे स्थान मिळाले. स्पर्धेत प्रथम 20 स्थान मिळविलेल्या बुद्धिबळपटूंना रोख बक्षीसे देण्यात आली. आरव प्रभुगावकर, दिया सावळ, अथर्व सावळ, महादेव सावंत व तेजस शेट वेरेकर यांना अनुक्रमे 7, 9, 11, 13 व 15 वर्षांखालील गटात उत्कृष्ट खेळाडूंचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत रोख बक्षीसे गीता कंटक यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली होती. आशेष केणी यांनी या स्पर्धेत आर्बिटरचे काम पाहिले.