केकेआरला 8 गडी राखून धूळ चारली, क्विन्टॉन-रोहितची धुवांधार फलंदाजी, राहुल चहरचे 2 बळी
वृत्तसंस्था/ अबु धाबी
क्विन्टॉन डी कॉक (44 चेंडूत नाबाद 78), कर्णधार रोहित शर्मा (36 चेंडूत 35) यांनी 10.3 षटकात 94 धावांची भरभक्कम सलामी दिल्यानंतर मुंबई इंडियन्सने एकतर्फी आयपीएल साखळी सामन्यात 149 धावांचे आव्हान सहज सर करत शाहरुख खानच्या केकेआर संघाला धूळ चारली. प्रारंभी, केकेआरला 20 षटकात 5 बाद 148 या माफक धावसंख्येवर रोखल्यानंतर मुंबईने 16.5 षटकात केवळ 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
रोहितनंतर तिसऱया स्थानावरील सुर्यकुमार यादव (10) स्वस्तात बाद झाला. मात्र, तोवर मुंबईच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. डी कॉक व हार्दिक पंडय़ा यांनी पुढे विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पंडय़ा 11 चेंडूत 21 धावांवर नाबाद राहिला.
विजयासाठी 149 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना रोहित शर्मा व क्विन्टॉन डी कॉक या सलामीवीरांनी धुवांधार फलंदाजी साकारली आणि इथे मुंबईची अर्धी मोहीम फत्ते झाली. पहिल्या चेंडूवरच चौकार वसूल करणाऱया रोहितने 36 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. शिवाय, डी कॉकसमवेत 10.3 षटकात 94 धावांची तडाखेबंद सलामी दिली. डावातील 11 व्या षटकात रोहित मावीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत बाद झाला. पण, तोवर मुंबईच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली होती.
पाचव्या षटकात चक्रवर्ती वरुणला शॉर्ट फाईनवरुन मागे धावत जात डी कॉकचा झेल टिपता आला नव्हता. इतका अपवाद वगळता डी कॉक व रोहित या दोघांचीही फलंदाजी तांत्रिकदृष्टय़ा निर्दोष ठरली. रोहित बाद झाल्यानंतर डी कॉकच्या साथीला इशान किशनऐवजी हार्दिक पंडय़ाला बढती देण्यात आली आणि त्यानेही आल्या पावली दोन चौकार फटकावत उत्तूंग फटकेबाजीचे इरादे स्पष्ट केले. कमिन्सला त्याने एक उत्तूंग षटकारही खेचला. शेवटच्या 4 षटकात 8 धावांची गरज असताना या जोडीने तोच धडाका कायम राखला आणि मुंबईने आणखी एका एकतर्फी विजयावर सहज शिक्कामोर्तब केले.
कमिन्स-मॉर्गनची फटकेबाजी
तत्पूर्वी, गोलंदाज या नात्याने संघात असलेल्या पॅट कमिन्सचे (36 चेंडूत नाबाद 53) झुंजार अर्धशतक व नवा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या (29 चेंडूत नाबाद 39) समयोचित खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 148 धावांची मजल मारली. वास्तविक, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर केकेआरचा निम्मा संघ 61 धावांमध्येच गारद झाला होता. पण, त्यानंतर कमिन्स व मॉर्गन या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 87 धावांची अभेद्य भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला.
पॅट कमिन्सने 36 चेंडूतील नाबाद 53 धावांच्या खेळीत 5 चौकार व 2 षटकार तर मॉर्गनने 39 धावांच्या नाबाद खेळीत 2 चौकार व 2 षटकार फटकावले. या उभयतांनी संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ या लढतीत साधला. शेवटच्या 5 षटकात या जोडीने 53 धावा फटकावल्या. यात काऊल्टर-नाईलला शेवटच्या षटकात झोडपलेल्या 21 धावांचा प्राधान्याने समावेश राहिला.
केकेआरचा नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, खराब प्रारंभामुळे त्यांना अपेक्षित संधी साधता आली नाही. पॉईंटवरील सुर्यकुमार यादवने अप्रतिम झेल टिपल्यानंतर राहुल त्रिपाठी केकेआरच्या डावातील बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. त्याला 9 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या. सुर्यकुमारने अनपेक्षित झेल टिपल्यानंतर जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट आश्चर्य लपवू शकला नाही.
तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरलेल्या नितीश राणाने या लढतीतही आणखी निराशा केली. त्याने काऊल्टर-नाईलच्या चेंडूवर डी कॉककडे सोपा झेल दिला. काऊल्टर-नाईलने नितीश राणाला सातत्याने आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आणि या चक्रव्युहात राणाची बरीच कोंडी झाली. हे दडपण झुगारुन टाकण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टीमागे झेल दिला. नितीश राणाला 6 चेंडूत 5 धावा करता आल्या.
या हंगामात उत्तम बहरात असलेला सलामीवीर शुभमन गिल 21 धावांवर बाद झाला. लाँगऑनवरुन षटकार खेचण्याचा त्याचा प्रयत्न फसला. सीमारेषेवर तैनात पोलार्डने त्याचा सोपा झेल टिपला.
फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेणाऱया दिनेश कार्तिकचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. उलटपक्षी, मागील लढतीत केलेली चूक येथेही त्याने सुधारली नसल्याचे स्पष्ट झाले. मागील लढतीत दिनेश कार्तिकला चहलने बाद केले होते. येथे देखील लेगब्रेक गोलंदाजानेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने राहुल चहरचा चेंडू आपल्याच यष्टीवर ओढवून घेतला.
विंडीजचा दिग्गज खेळाडू आंद्रे रसेलने 9 चेंडूत 1 चौकार व एका षटकारासह 12 धावा केल्या. पण, तो ही याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नाही. कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत बदल करत बुमराहला आणले आणि रस्सेल बुमराहच्या एका उसळत्या चेंडूवर डी कॉककडे सोपा झेल देत तंबूत परतला. अगदी न खेळता येण्याजोग्या त्या चेंडूवर रस्सेलने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि डी कॉकने मागे धावत जात झेल पूर्ण केला. यानंतर मात्र मुंबईला केकेआरचा एकही गडी बाद करता आला नाही.
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : राहुल त्रिपाठी झे. यादव, गो. बोल्ट 7 (9 चेंडूत 1 चौकार), शुभमन गिल झे. पोलार्ड, गो. चहर 21 (23 चेंडूत 2 चौकार), नितीश राणा झे. डी कॉक, गो. काऊल्टर-नाईल 5 (6 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक त्रि. गो. चहर 4 (8 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन नाबाद 39 (29 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), आंद्रे रसेल झे. डी कॉक, गो. बुमराह 12 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), पॅट कमिन्स नाबाद 53 (36 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार). अवांतर 7. एकूण 20 षटकात 5 बाद 148.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-18 (राहुल त्रिपाठी, 2.6), 2-33 (नितीश राणा, 5.3), 3-42 (शुभमन, 7.3), 4-42 (दिनेश कार्तिक, 7.4), 5-61 (रसेल, 10.4).
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट 4-0-32-1, नॅथन काऊल्टर-नाईल 4-0-51-1, जसप्रित बुमराह 4-0-22-1, कृणाल पंडय़ा 4-0-23-0, राहुल चहर 4-0-18-2.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. कार्तिक, गो. शिवम मावी 35 (36 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), क्विन्टॉन डी कॉक नाबाद 78 (44 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), सुर्यकुमार यादव त्रि. गो. वरुण 10 (10 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 21 (11 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). अवांतर 5. एकूण 16.5 षटकात 2 बाद 149.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-94 (रोहित, 10.3), 2-111 (सुर्यकुमार यादव, 13.3),
गोलंदाजी : ख्रिस ग्रीन 2.5-0-24-0, पॅट कमिन्स 3-0-28-0, एम. प्रसिद्ध कृष्णा 2-0-30-0, आंद्रे रसेल 2-0-15-0, चक्रवर्ती वरुण 4-0-23-1, शिवम मावी 3-0-24-1.