वृत्तसंस्था/ माले (मालदीव)
येथे सुरू असलेल्या एएफसी चषक क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत शनिवारी ड गटातील सामन्यात एटीके-बागान संघाने मालदीवच्या माझिया स्पोर्ट्स व रिक्रिएशन क्लबचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. आता या स्पर्धेची बाद फेरी गाठण्याकरिता एटीके बागान संघाला आपल्या गटातील शेवटचा बांगलादेशच्या बसुंधरा किंग्सविरुद्धचा सामना अनिर्णित ठेवण्याची जरूरी आहे.
शनिवारी झालेल्या एटीके बागान आणि मालदीव क्लब यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत बागानचा संघ एका गोलाने पिछाडीवर होता. मालदीवच्या माझीया स्पोर्ट्स क्लबतर्फे 25 व्या मिनिटाला इब्राहिम ऐशामने गोल नोंदविला. दरम्यान बागानतर्फे खेळाच्या उत्तरार्धात तीन गोल नोंदवित मालदीव क्लबचे आव्हान संपुष्टात आणले. एटीके बागानतर्फे 48 व्या मिनिटाला कुलासोने, 63 व्या मिनिटाला रॉय कृष्णाने आणि 77 व्या मिनिटाला मानवीर सिंगने गोल नोंदविले. या स्पर्धेत एटीके बागान संघाने आपल्या गटातील पहिले दोन्ही सामने जिंकत चार गुण मिळविले आहेत. आता बागानचा ड गटातील शेवटचा सामना मंगळवारी बसुधरा किंग्स बरोबर होणार आहे.
शनिवारी झालेल्या अन्य एका सामन्यात भारताच्या बेंगळूर एफसीने बसुंधरा किंग्सला गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यामुळे या स्पर्धेतून दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याआधी बेंगळूर एफसीला एटीके-बागानकडून पहिल्या सामन्यात 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.