वार्ताहर / सदलगा
वायव्य कर्नाटक राज्य परिवहन संस्थेचे अध्यक्ष व्ही. एस. पाटील यांनी सदलगा हायटेक बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रवाशांनी समस्या मांडताना कोटय़वधी रुपये खर्चून अद्यावत बसस्थानकाची निर्मिती केली तरी बसस्थानकाच्या आवारात लाल माती टाकल्याने पावसाळय़ात दलदल होते. याबद्दल माहिती देऊनही अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनस आणून दिले. तसेच सदलगा-जोतिबा बस बंद असल्याने ती पूर्ववत करण्याची व सदलगा, दत्तवाड नृसिंहवाडीमार्गे निपाणी-सांगली अशा नव्या गाडय़ा सोडण्याची मागणी केली. बसस्थानक परिसरातील रिक्षाचालकांनी अधिकृत रिक्षा थांब्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. यावेळी व्ही. एस. पाटील यांनी बसस्थानक आवारात डांबरीकरण करून चार गाडय़ा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी संजू पाटील शिरीष आडके अशोक बाजक्के महादेव कुडकुडे प्रविण माने प्रविण कमते शांतिनाथ उगारे यांच्यासह नागरिक प्रवाशी व रिक्षाचालक उपस्थित होते.